गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३


प्रत्येक कुटुंबाला आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा : श्रीमती सोनिया गांधी
विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत राजीव गांधी
जीवनदायी आरोग्य योजनेचे लोकार्पण
नागपूर, दि. 21 :  आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेते, त्याप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणारी योजना आहे. या योजनेचा महिला व बालकांसोबतच प्रत्येक व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या  अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी आज केले.
कस्तुरचंद पार्कच्या भव्य मैदानावर विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लोकार्पण सोहळा श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते पाड पडला. प्रारंभी श्रीमती गांधी यांनी योजनेचा शुभारंभ करुन या योजनेतील लाभार्थ्यांना आरोग्य स्वास्थकार्डाचे वाटप केले. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या 78 लाभार्थ्यांशी भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची आस्थेने  चौकशी केली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, खासदारद्वय विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजना मंत्री डॉ.नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आरोग्य राज्यमंत्री प्रा.फौजिया खान, मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे मंचावर उपस्थित होते.   
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करुन श्रीमती सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, शरीर आणि मन स्वस्थ राहाणे आवश्यक आहे. आरोग्याच्या मुलभूत सुविधा बालकांना व महिलांना देण्यासाठी केंद्र व राज्यशासन कटीबद्ध असून समाजातील शारीरिक दुर्बल घटकांना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देऊन त्यांचे मनोबल आणि मनोधैर्य कायम ठेवण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
 शासन ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्यविषयक सुविधांच्या सुधारणेकडे विशेष लक्ष देत असून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सामान्य नागरिकांच्या कल्याणाच्या सर्व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे सांगतांना श्रीमती सोनिया गांधी म्हणाल्या की, सर्वसामान्य जनतेला होणारा आरोग्य विषयक त्रास  हा केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित नसून त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळेच राजीव गांधी जीवनदायी योजनांची सुरुवात केली आहे. गरीब जनतेला आरोग्यविषयक उपचारासाठी असंख्य अडचणींना सामारे जावे लागते. त्यासाठी स्वत:कडील घर, जमीन विकावी लागते. कर्ज घ्यावे लागते तर प्रसंगी आरोग्यावरील खर्चामुळे मुलांचे शिक्षणसुद्धा पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी असल्याचेही श्रीमती गांधी यांनी यावेळी सांगितले.
 जीवनदायी आरोग्य योजना ही सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये लागू करण्यात आली असून रुग्णांना या योजनेमध्ये सर्वप्रकारच्या शस्त्रक्रियेसह मोफत औषध, भोजन तसेच घरी येण्याजाण्यासाठी रेल्वे किंवा बसचे भाडेही दिल्या जाणार आहे. महिलांनी आपले आजार यापुढे केवळ सहन न करता तसेच दुर्धर आजारामध्ये आपले प्राण न गमावता राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा. एक अंधेरा था अब नये रोशनीमे बदल जायेगा हा आत्मविश्वास बाळगावा, असे आवाहन त्यांनी संपूर्ण महिलांना यावेळी केले.
महाराष्ट्र शासनाने पथदर्शी म्हणून जीवन अमृत यासारखी योजना राबवून प्रत्येक रुग्णांना मागणीनुसार रक्ताचा पुरवठा तसेच ग्रामीण व शहरी भागातील जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण योजनेद्वारे जनतेला सुदृढ आरोग्याचा विश्वास दिला आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यातून आलेल्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिल्याबद्दल श्रीमती सोनिया गांधी यांनी धन्यवाद दिले.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी योजना आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबांना अत्यंत दर्जेदार आरोग्यसुविधा पुरविण्यासोबतच मागेल त्याला रक्त हे जीवन अमृत योजना, रुग्णांसाठी ॲम्ब्युलंस सेवा तसेच सीटी स्कॅन, एमआरआय यासारख्या अत्यंत प्रगत व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रगतीशील आणि विकसित राज्यासोबतच कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवितांनाच सामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहे. त्यापैकी अनेक योजनांची अंमलबजावणी केंद्रस्तरावरही सुरु आहे. ई-प्रशासनाद्वारे जनतेला घरबसल्या सर्व दाखले देण्यासोबतच अतिवृष्टी आणि दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने यशस्वीपणे उपाययोजना केल्या व मदतही दिली. शासन राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र व राज्य शासनाने सर्व सामान्य जनतेच्या कल्याणाचे विविध निर्णय घेतले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, आदिवासींना जमिनीचे पट्टे, इंदू मिलचा प्रश्न तसेच विदर्भातील अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत दिल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
श्रीमती सोनिया गांधी यांचे कस्तुरचंद पार्कवर आगमन होताच त्यांनी  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यानंतर या योजनेची लाभार्थी ठरलेली गडचिरोली जिल्ह्यातील कुमारी निराशा गेडाम हिने श्रीमती सोनिया गांधी यांचे सुताची माळ घालून स्वागत केले. तसेच हृदयशस्त्रक्रिया झालेले सुरज रोहिदास नेताम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे तर मनीष दिपक घोरमाडे यांनी प्रफुल्ल पटेल यांचे स्वागत केले.
जीवनदायी आरोग्य योजना स्वास्थ कार्डाचे वितरण
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी लाभार्थी ठरलेल्या श्रीमती शंकुतला भगत यांना श्रीमती सोनिया गांधी यांनी स्वास्थ कार्ड देऊन या योजनेचा शुभारंभ केला. तसेच सलाम मुस्तफा नबी, कुरेशा बेगम शेख हसन, आनंदराव आत्माराम मेश्राम, कविता धर्मेद्र नारनवरे, सुनीता संजय गोलाई यांनाही स्वास्थकार्डाचे वितरण श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी प्रास्ताविकात राजीव गांधी जीवनदाय आरोग्य योजनेची तसेच महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या चार महत्वपूर्ण आरोग्य योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी तर आभार आरोग्य राज्यमंत्री प्रा.फौजिया खान यांनी केले.

                                                   ** * * * **

राजीव गांधी आरोग्यदायी जीपनदायी विमा योजनेचा लोकार्पण सोहळा आज नागपूर येथे झाला, त्याची काही क्षणचित्रे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा