गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

 प्रसारमाध्यमांनी विश्वासार्हता जपणे आवश्यक - मुख्यमंत्री
          मुंबई दि, 21 : इंटरनेटमुळे माहितीचा खजिना उपलब्ध झाला असून याद्वारे सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही वेळा अफवा पसरविणे तसेच जातीय सलोखा बिघडविणे यासाठीही या सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी विश्वासाहर्ता जपण्याबरोबरच जबाबदारीचीही जाणिव ठेऊन काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
          निर्धार ट्रस्टतर्फे काल ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या एकसष्टीनिमित्त  मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.  यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महापैार सुनील प्रभू,विधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, आमदार बाळा नांदगावकर,  मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, ज्येष्ठ पत्रकार व खासदार भारतकुमार राऊत, अरविंद कुलकर्णी, प्रकाश अकोलकर,  त्रिकालचे  संपादक मनोज चमणकर, सुधीर गाडगीळ तसेच अनेक लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. 
          यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुकृत खांडेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्‍छ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच त्रिकालच्या  "गरुडझेप" या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
श्री. खांडेकर यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले, वृत्तपत्रातील माहितीला जी विश्वासार्हता असते ती न्यूज चॅनलवरील बातम्यांना यायला बराच अवधी लागेल.  जनसंपर्कासाठी एजन्सीज नेमून राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरु असून राजकारणी व पत्रकार यांनी परस्परांशी संवाद साधून विश्वास संपादन व वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.  श्री. खांडेकर हे सोज्वळ मनाचे मितभाषी पत्रकार मित्र असून त्यांच्याबद्दल व त्यांच्या पत्रकारितेबाबत  प्रत्येकालाच आदर वाटतो. 
          सत्काराला उत्तर देताना  श्री. खांडेकर म्हणाले, आपल्या 40 वर्षांच्या पत्रकारितेत मी सदैव सर्वसामान्यांच्या व उपेक्षित लोकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज माझा होत असलेला गौरव हा मराठी पत्रकार व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्व पत्रकार संघटनांचा आहे.  मुख्यमंत्री भेटत नाहीत, ही माहिती चुकीची असून ते चांगल्या कामासाठी "वर्षा" वर येणाऱ्या सर्वांना भेटतात. सद्या मिडियामध्ये अस्थिरतेचे वातावरण असून तरुण पत्रकारांना कोणतेही कारण न देता नोकरीवरुन काढले जात आहे.  या प्रश्नामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा.
          यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महापौर सुनील प्रभू, आमदार विनोद तावडे, बाळा नांदगावकर, देवदास मटाले, भारतकुमार राऊत, अरविंद कुलकर्णी, प्रकाश अकोलकर, मनोज चमणकर, सुधीर गाडगीळ  आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा