गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

टेंभू, उरमोडी व जिहे कटापूरसाठीचा निधी
नियोजनबध्द रितीने खर्च करावा : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 19: टेंभू, उरमोडी आणि जिहे कटापूर पाटबंधारे प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. बदलेले हवामानचक्र आणि अनियमित पाऊस लक्षात घेता दुष्काळी भागातील जनतेला सिंचनाबरोबरच पिण्याचे पाणी श्वाश्वतीने मिळावे, यासाठी या तिन्ही प्रकल्पांसाठी चालू वर्षी उपलब्ध करुन दिलेला निधी नियोजनबध्द रितीने खर्च करावा, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे उरमोडी, जिहे कटापूर व टेंभू उपसा सिंचन योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री आर.आर. पाटील, जलसंपदा मंत्री शशीकांत शिंदे, जलसंपदा विभागचे प्रधान सचिव एकनाथ पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार सदाशिव पाटील, आमदार संजय पाटील, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.  
श्री. चव्हाण म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात टेंभू प्रकल्पासाठी 152 कोटी, जिहे कटापूर प्रकल्पासाठी 137 कोटी आणि उरमोडी प्रकल्पासाठी 145 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी खर्च करताना जी कामे पूर्ण केल्याने पुढील पावसाळ्यातील पावसाचे पाणी अडून त्याचा फायदा अवर्षणप्रवण भागाला होईल, असे नियोजन आवश्यक आहे. तसेच ही कामे हाती घेताना टंचाई निवारणालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणामुळे सातारा तालुक्यातील 8300 हेक्टर, खटाव तालुक्यातील  9725 हेक्टर व माण तालुक्यातील 9725 हेक्टर असे एकूण 27750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 1417.75 कोटी इतकी असून या प्रकल्पावर आजपर्यंत 709.68 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी 125 कोटी रुपये निधी उपलब्ध असून या निधीतून दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळण्याच्यादृष्टीने टप्प्यानुसार कामे हाती  घेण्यात आली आहेत.
जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेवर एकूण 980.07 कोटी खर्च करण्यात येणार असून या योजनेमुळे खटाव तालुक्यातील 11,700 हेक्टर, माण तालुक्यातील 15,800 हेक्टर असे एकूण 27,500 हेक्टर  सिंचनाखाली  येणार आहे. या योजनेंतर्गत आवश्यक असणारी पंपगृह क्र. 1, 2 व 3 ची कामे सध्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत.  उर्वरित कामे उपलब्ध 137 कोटी रुपये निधीतून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  दिले.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 80,472 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली  येणार आहे. यामध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ व सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी यावर्षी 152 कोटी रुपये निधी उपलब्ध असून टेंभूचे पाणी सांगोला कालवा कि.मी.क्र.9 पर्यंत बुधीहाळ तलावामध्ये आणण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी, असे आदेश ही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी  संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
000000000000000000000000000000000000000000000000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा