शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते झाले, त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, इंजि. शैलेंद्र लळीत उपस्थित होते. 
प्रा. डॉ. लळीत यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
लोककला आणि बोलीभाषा टिकण्यासाठी
अभ्यास, संशोधन आणि संवर्धन आवश्यक
                                         -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. २३ : लोककला आणि बोलीभाषा यांचे नाते अतूट असुन आजच्या आधुनिक जगात व मनोरंजनाच्या धबडग्यातही यांचे अस्तित्व कायम आहे. मात्र भविष्यकाळात लोककला आणि बोलीभाषा टिकण्यासाठी त्यांचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन आवश्यक आहे. यादृष्टीने प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी लिहिलेली पुस्तके महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सद्या शिरुर (जि. पुणे) येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री चव्हाण यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या छोटेखानी समारंभाला लळीत बंधुंचे स्नेही व सामाजिक कार्यकर्ते नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, इंजि. शैलेंद्र लळीत उपस्थित होते.
          श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषा हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. या बोलीभाषांनी मराठीचे दालन समृद्ध केले आहे. बोली या प्रमाणभाषेला समृद्ध करीत असतात. त्यामुळे त्यांचे संशोधन झाले पाहिजे. बोलींप्रमाणेच महाराष्ट्रातील लोककलांचे दालनही अतिशय समृद्ध आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या पारंपरिक लोककलांनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अशा राष्ट्रीय कार्यामध्येही मोठै योगदान दिले आहे. आता मनोरंजनाचे जग बदलले आहे. मात्र या बदलत्या काळातही लोककलांचा हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जपणे आवश्यक आहे. डॉ. लळीत यांची तिन्ही पुस्तके यामध्ये महत्वाचे योगदान देतील, असे कौतुकोद्गार श्री. चव्हाण यांनी काढले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी दशावतार व कोकणातील अन्य लोककलांबद्दल आस्थेने चौकशी केली. विशेषत: दशावतार लोककलेतील उत्स्फुर्तता, पुरुषांकडुन केल्या जाणाऱ्या स्त्री भूमिका यामुळे ते प्रभावित झाले. कोकणातील देवस्थाने, जत्रा, परंपरा, मालवणी बोली याबद्दल त्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले.
सामाजिक कार्यकर्ते नितेश राणे यांनीही या पुस्तकांबद्दल डॉ. लळीत यांचे अभिनंदन केले. सतीश लळीत यांनी आभार मानले.
0000000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा