रविवार, २ जून, २०१३

पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना दुष्काळी तालुक्यांत
सिमेंट नाला बंधारे बांधण्यासाठी प्रत्येकी 8 कोटी रूपये : मुख्यमंत्री
पुणे, दि. 2 : पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना टँकरग्रस्त व दुष्काळी तालुक्यात सिमेंट नाला बंधारे बांधण्यासाठी प्रत्येकी 8 कोटी रूपये मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. ज्या तालुक्‌यांत बंधाऱ्यांची कामे झालेली नाहीत, तेथे हा निधी खर्च करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुणे विभागाची पाणी टंचाई आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, महापालिका आयुक्त महेश पाठक,  विभागातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सिंचन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्या गावांत कायमस्वरूपी पाणीटंचाई आहे, त्याठिकाणी लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत. त्यामुळे टँकरमुक्त गावांची संख्या वाढेल. जलसंवर्धनाच्या कार्यक्रमात लोकांचा वाढता सहभाग ही यावेळची मोठी उपलब्धी आहे.  गेल्या सहा महिन्यांत राज्यात 150 कोटी रूपयांचे 1931  नालाबांध तयार झाले असून 9 जूनला सकाळी 11 वाजता राज्यभरात त्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम एकाच वेळी घेतला जाईल.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करताना लोकसहभागतून मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सिंचन प्रकल्पातील क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकल्याने शेतीच्या सुपिकतेत वाढ झाली आहे. पर्यायाने उत्पादन वाढ होईल.  सिंचनप्रकल्पातील काढलेला काही गाळ हा नगरपरिषदांच्या शाळा, बागा व इतर सार्वजनिक ठिकाणावर मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणाऱ्या वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी वापरावा.  टँकरद्वारे पाणीपुरवठा करून लावलेली झाडे जगवावीत. 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून महात्मा फुले जल अभियानासाठी फळबाग पुनरूज्जीवन योजनेअंतर्गत पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 65 हजार शेतकऱ्यांना एकरी 30 हजार रूपये याप्रमाणे 110 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आषाढी एकादशी यात्रेच्या वेळी पंढरपूर येथे पाणीटंचाई असणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. श्री. देशमुख यांनी यावेळी विभागातील पाणीपुरवठा उपाययोजना, जनावरांच्या चारा छावण्या, रोजगार हमी योजनेवरील सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
यावर्षीच्या दुष्काळाचे आव्हान राज्य शासनाने समर्थपणे पेलले असून आतापर्यंत कधी नव्हे इतके लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. जलयुक्त गाव मोहिमेतून पुणे विभागातील 2286 कामे पूर्ण झाली असून 527 किलोमीटर नालापात्र खोली आणि रूंदीची कामे झाली आहेत.  तसेच 224 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे जवळपास 8.54 टीएमसी एवढा पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे विभागातील दुष्काळी भागात 269 कोटींची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे झाली आहेत. या दुष्काळात 608 चारा छावण्यांतून 4 लाख 87 हजार जनावरे सांभाळली जात आहेत. 1540 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा