मंगळवार, २९ जानेवारी, २०१३


मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतल्या मान्यवरांच्या भेटीगाठी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या शुभारंभाचे
श्रीमती सोनिया गांधी यांना दिले निमंत्रण
दुष्काळ निवारणासाठी २२७० कोटी रुपयांची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली : दिल्ली येथील दोन दिवसाच्या दौऱ्यात आपण विविध नेत्यांची भेट घेतली असून, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी आणखी 2270 कोटी रूपयांची आवश्यकता असल्याची मागणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटून केली आहे. दरम्यान, मच्छीमारांच्या प्रश्नासंबंधी संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून याचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून मच्छीमार बांधवांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना केले आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती व अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व जलसंधारण मंत्री हरीष रावत यांना भेटून निवेदन सादर केल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. केंद्र शासन जनावरांच्या छावण्या चालविण्यासाठी प्रत्येक जनावरामागे 32 रुपये देते व 15 दिवसांसाठी छावणीची सुविधा देते. तथापि महाराष्ट्र शासन प्रत्येक जनावरामागे 60 रुपये देते. काही ठिकाणी जनावरांना वर्षभरासाठी छावण्या चालविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाने या दरात व कालावधीत विशेष बाब म्हणून वाढ करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान व मंत्री महोदयांकडे केली. त्यासाठी राज्यातील दुष्काळ निवारणाकरीता किमान रुपये 2270 कोटीचे विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, डिझेलच्या दरात प्रति लीटर 12 रुपयाने वाढ झाल्याने मासेमारी, साखर कारखाने व एस.टी महामंडळांच्या कामावर विपरित परिणाम होत आहे. राज्यात मासेमारी व्यवसाय 18 जानेवारी पासून ठप्प झाले आहे. मच्छीमारांना डिझेल खरेदीवर सवलत पूर्ववत करण्यासाठीचे निवेदन आज आम्ही एका शिष्टमंडळासह केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली व राहुल गांधी यांना सादर केले. शिष्टमंडळात मोहन प्रकाश, आमदार माणिकराव ठाकरे व मासेमारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांचा समावेश होता. दोन्ही नेत्यांनी मच्छीमारांच्या समस्या गांभिर्याने समजून घेतल्या असून, त्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, संरक्षण मंत्री ए.के. अटोनी, पर्यावरण मंत्री जयंती नटराजन, आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद, जलसंधारण मंत्री हरीष रावत, योजना आयोगाचे सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन आदी मान्यवरांच्या भेटी घेतल्या व राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई डिझेल भाववाढ, मुंबई व कोकणातील पर्यावरण विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती यावेळी दिली.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीबाबतचा निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडे सादर केल्याचे सांगताना, कृषी मंत्री यांना हे निवेदन उच्च अधिकार समितीपुढे ठेवण्याची विनंती केल्याची माहिती दिली. यावेळी कृषीमंत्री यांना केंद्र शासनाकडून रब्बी पिकासाठी राज्यात पाहणी पथक पाठविण्याचीही विनंती केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. 

कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग हे जिल्हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आल्यामुळे त्या भागातील विकासाची कामे खोळंबली असून प्रामुख्याने जामदगड, चिरेखनी, रेती उपसा यांचा अंर्तभाव असल्याने बांधकामांच्या कामावर विपरित परिणाम झाले आहे. उंचस्तरीय इमारती बांधण्यास घातलेली बंदी उठवण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांना भेटून चर्चा केली. 

दाभोळ व उरण प्रकल्पांना पुरेसे गॅस पुरवठ्या अभावी महाराष्ट्र राज्य विपरित परिस्थितीला तोंड देत आहे. या प्रकल्पांना पुरविण्यात येणारा गॅस आवश्यकते पेक्षा खूप कमी असून त्यात तातडीने वाढ होण्याची गरज आहे. याबाबतची चर्चा केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांच्यासोबत केल्याचे त्यांनी प्रतिपादित केले.

राज्यातील संवेदनशील प्रश्नांबाबत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल सादर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांच्याकडे केल्याची माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य महिला आयोग अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत युपीएच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले. ही केंद्र सरकारची नवी योजना असून तिच्या शुभारंभाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.
महाराष्ट्रात गेली काही वर्षे पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय आरोग्य तपासणी योजना अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. या योजनेचे यश पाहून केंद्राने याच धर्तीवरील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना देशपातळीवर सुरु करण्याचे ठरविले आहे. या योजनेच्या उद्घाटन समारंभासाठी श्री. चव्हाण यांनी श्रीमती गांधी यांना आज निमंत्रण दिले.

पंतप्रधांनांसह मान्यवरांच्या भेटी
आज दिवसभरात मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, पर्यावरण मंत्री श्रीमती जयंती नटराजन, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, डॉ. कस्तुरीरंगन आदी मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, डिझेल भाववाढ, मुंबई व कोकणातील पर्यावरणविषयक प्रश्न इत्यादी प्रश्नांबाबत चर्चा झाली.
याचबरोबर श्री. चव्हाण यांनी आज श्री. अहमद पटेल, श्री. मोहन प्रकाश यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
                                                            0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा