टंचाईप्रश्न सोडविण्यास मुख्यमंत्र्यांचे
प्राधान्य
जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी
उपलब्ध निधीतून 25 कोटी रूपयांचा निधी
मुंबई, दि. 8 : सांगली जिल्ह्यातील जत शहराचा पाणी
पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपलब्ध निधीतून तातडीने 25 कोटी
रूपयांचा निधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला आहे.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी
मुख्यमंत्र्यांनी रविवारी सांगली जिल्ह्याचा दौरा केला होता. या संदर्भात
मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना
केल्या होत्या. सांगली जिल्हयातील जत शहराचा पाण्याचा स्त्रोत म्हणून बिरनाळ
तलावाचे पाणी वापरण्यात येते. सन 2011 तसेच सन 2012 च्या भीषण दुष्काळी
परिस्थितीमुळे हा तलाव कोरडा पडला असून जत शहराला सध्या टँकरद्वारे पाणी
पुरवठयाशिवाय पर्याय उरलेला नाही. सध्या
जत वासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जत शहराचा पाणी पुरवठयाचा प्रश्न सोडवण्याच्या
दृष्टीने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या जत कालव्यातून बिरनाळ तलावात पाणी
सोडणेबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी डोर्ली येथे म्हैसाळ योजनेच्या पाणीपूजनाच्या
वेळी दिल्या होत्या.
दरम्यानच्या काळात जत कालवा किलोमीटर 20 ते 31 मधील
बहुतांश कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. सद्द:स्थितीत पाणी किलोमीटर 32
पर्यत पोहचविण्यात आले असून त्यातून कोसारी तलावात पाणी सोडण्यात येत आहे. उर्वरित
ठिकाणची मातीकामे व बांधकामे यांची कामे अंशत: पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच म्हैसाळ टप्पा क्र. 1 ते 5 मधील जादा पंप
सुरु करण्यासाठी आवश्यक पंप दुरुस्ती करणे तसेच नरवाड कळयंत्र आवरातील 8 एमकेव्ही
ट्रान्स्फॉर्मर इत्यादी विद्युत कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
ही सर्व कामे पूर्ण केल्यामुळे कुंभारी पाझर तलाव व
कोसारी ल. पा. तलावामध्ये पाणी सोडणे शक्य झाले आहे. काल मुख्यमंत्री यांनी
कुंभारी पाझर तलाव व कोसारी लघु पाटबंधारे तलाव यांची पाहणी केली. यासाठी टंचाई निधीतून 25 कोटी रूपये मंजूर
केल्याचे जाहीर केले. त्यानुसार प्रकल्पास उपलब्ध असलेल्या निधीतून ( केंद्र
शासनाच्या एआयबीपी योजनेतून वितरित अर्थ सहाय्य
तसेच राज्य शासन हिस्सा या मधून ) 25 कोटी रूपये एवढी तरतूद वितरित करण्यास
मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंजूरी दिली.
जत कालव्याच्या 21 ते 40 किलोमीटर मधील कामे पूर्ण
झाल्यावर प्रतापपूर, कुंभारी, कोसारी, कंठी, बिरनाळ या तलावात एकूण 540 दलघफू पाणीसाठी
होणार असून त्यामुळे प्रतापपूर, धवडवाडी, हिवरे, जांभुळवाडी, गुळवंची,
कुंभारी, कोसारी, कासलिंगवाडी,
शेगांव, कंठी, बिरनाळ व
जत या गावातील अंदाजे 73 हजार 685 लोकसंख्येस पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा