शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३



शिक्षकांनी भावी पिढीच्‍या गुणवत्‍ता वाढीवर भर दया -    मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण
सिंधुदुर्गनगरी 11 – महाराष्‍ट्राची भावी पिढी जागतिक व्‍यासपीठावर टिकली पाहिजे,भावी पिढीला दिले जाणारे शिक्षण गुणवत्‍तापुर्ण, दर्जेदार असावे यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. शिक्षक संघटनांच्‍या मागण्‍यापैकी तालुक्‍याअंतर्गत बदल्‍या करणे, प्रसुती कालावधीमध्‍ये पर्यायी शिक्षक देणे, इंग्रजी विषयासाठी तज्‍ज्ञ शिक्षक नेमणे, अप्रशिक्षीत शिक्षकांना सेवानिवृत्‍ती वेतन देण्‍याच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍यात आलेल्‍या आहेत शिक्षकांनी या हक्‍काबरोबर महाराष्‍ट्राची  भावी पिढी घडविताना गुणवत्‍ता वाढीवर भर दया असे आवाहन मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी केले.
       सिंधुदुर्गनगरी येथे  महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक खास अधिवेशन व शिक्षण परिषद ओरोस येथे आयोजित करण्‍यात आली होती यावेळी उदघाटक म्‍हणून मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उद्योग,बंदरे तथा  पालकमंत्री ना.नारायण राणे, ग्रामविकास मंत्री ना.जयंत पाटील,कामगार कल्‍याण मंत्री ना.हसन मुश्रीफ, नगरविकास राज्‍यमंत्री ना.भास्‍करराव जाधव,गृह व ग्रामविकास राज्‍यमंत्री ना.सतेज पाटील, शालेय शिक्षण राज्‍यमंत्री ना.फौजिया खान, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ.निकीता परब, आमदार उदय सामंत, र के.पी.पाटील, दीपक केसरकर, भगवानराव साळुंखे,आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्‍यक्ष आमदार शिवाजीराव पाटील, महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्‍यक्ष संभाजीराव थोरात यासह राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयातून आलेले शिक्षक या अधिवेशनासाठी उपस्थित होते.  
            मुख्‍यमंत्री म्‍हणाले,शिक्षक संघटनांच्‍या विविध मागण्‍या आहेत. त्‍यापैकी बहुतांश मागण्‍या आम्‍ही मान्‍य केलेल्‍या आहेत. देशाची भावी पिढी घडविण्‍याचे काम शिक्षकांचे आहे त्‍यामुळे शिक्षकांच्‍याही अडचणी समजून घेवून त्‍या प्राधान्‍याने सोडविण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे.इंग्रजी  भाषा येणे ही काळाची गरज बनली आहे त्‍यामुळे इंग्रजी भाषा हा विषय शिकविण्‍यासाठी जिल्‍हा परिषद अथवा शासनाच्‍या शाळेत नेमला जाणारा शिक्षकालाही पात्रता टेस्‍ट घेण्‍यात येणार आहेत.आज शिक्षण क्षेत्रात गुणवत्‍ता वाढली पाहिजे यासाठी शासन जास्‍त प्रमाणात लक्ष घालत आहे.
           मुख्‍यमंत्री म्‍हणाले,महाराष्‍ट्र राज्‍य आज औदयोगीकीकरणात अग्रस्‍थानावर असणारे राज्‍य आहे. शिक्षण,आरोग्‍य या क्षेत्रातही आपण क्रमांक एकवरच असायला हवे आहे. काही ठिकाणी प्रादेशिक असमतोल आहे पण तो नैसर्गिक साधन संपदेमध्‍ये जास्‍त प्रमाणात असमतोल दिसुन येतो.देशात जर विकास करायचा असेल तर यापुढे नैसर्गिक साधन संपत्‍तीवर आधारित विकास न करता बौध्‍दीक कौशल्‍यावर आधारित विकास करावा लागेल असे मतही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.   
            केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्‍हा हा महाराष्‍ट्रातील पहिला साक्षर जिल्‍हा आहे हे औचित्‍य पाहुन शिक्षक संघटनानी या अधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्‍हयाची निवड केली हे अतिशय योग्‍य आहे.अधिवेशनामध्‍ये आलेल्‍या शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्‍हयाचा आदर्श घेवून काम केले पाहिजे असे मतही केंद्रीय कृषीमंत्री
शरद पवार यांनी व्‍यक्‍त केले.
      ना.नारायण राणे म्‍हणाले, शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे यासाठी शासनाकडून ही विविध प्रयत्‍न केले जात आहेत.भावी पिढी गुणवत्‍ता पुर्ण निर्माण करण्‍याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांनी आपल्‍या हक्‍काबरोबर कर्तव्‍याचेही विचारमंथन करून देशाची भावी पिढी संस्‍कारक्षम बनवावी.उच्‍च शिक्षणातून दर्जेदार नोक-या व नोक-यांच्‍या माध्‍यमातून दरडोई उत्‍पनातही मोठया प्रमाणात वाढ होण्‍यास मदत होईल.
           ग्रामाविकास मंत्री ना. जयंत पाटील म्‍हणाले,  शिक्षकांचे अनेक प्रश्‍न आहेत ते सोडविण्‍यासाठी शासन नेहमीच प्रयत्‍नशील आहे , शिक्षण क्षेत्रात गुणवत्‍ता पुर्ण शिक्षण विदर्यार्थ्‍यांना मिळावे यासाठी कुठेही तडजोड करण्‍यात येणार नाही.बालकांना सक्‍तीचे मोफत शिक्षण कायदा,कॉपी मुक्‍त अभियान,पटपडताळणी मोहीम हे विषय शासनस्‍तरावरून प्रभावीपणे राबविलेले आहेत.शिक्षक संघटनाने ज्‍या काही मागण्‍या केलेल्‍या आहेत त्‍यामध्‍ये अप्रशिक्षीत शिक्षकांना सेवानिवृत्‍ती वेतन देण्‍यात येईल.चांगले काम करणा-या शिक्षकांना आगावू वेतनवाढ ही करण्‍यात येईल.शिक्षण प्रभावी,गतीमान करण्‍यासाठी शासनाकडून अनेक नियम करून त्‍याची प्रभावी अंमलबजावणीही केली जात आहे.बदल्‍याचे नियम हे त्‍या त्‍या परिस्‍थीती व विषयाच्‍या अनुशंगाने आहेत यामध्‍ये पती- पत्‍नी एकत्रीकरणा अंतर्गत तालुक्‍यात एकाच ठिकाणी बदली या विषयातही बदल करण्‍यात येतील असे आश्‍वासन ना. पाटील यांनी दिले.                     
       ना.फौजिया खान म्‍हणाल्‍या, बालकांना सक्‍तीचे मोफत शिक्षण या कायदयामुळे भारत महासत्‍ता होण्‍यास मदत होणार आहे.राज्‍य शासनातर्फे राबविण्‍यात आलेली पटपडताळणी मोहीम, कॉपीमुक्‍त अभियान, शाळांचा बहृत आराखडा, अल्‍पसंख्‍याक समाजासाठी नवे धोरण,पटपडताळणीमध्‍ये असलेले अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन हे विषय शासन प्रामुख्‍याने राबवून गतीमान शिक्षणपध्‍दती , गुणवत्‍तापुर्ण भावी पिढी निर्माण करण्‍यासाठी,शिक्षणाच्‍या सार्वत्रिकरणासाठी
       आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्‍यक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी  प्रास्‍ताविक केले . त्‍यांनी यावेळी शिक्षक संघटनेच्‍या विविध मागण्‍या मांडल्‍या, प्रशासकीय बदली रद्द करा, बालशिक्षण हक्‍क विधेयकाला तरतुदीनुसार पदनिश्‍चीती करा, नि‍मशिक्षकांना 12 महिन्‍यांचे वेतन मिळावे, अप्रशिक्षीत व प्रशिक्षीत शिक्षक सेवक यांना शिक्षक म्‍हणून नेमणूक देण्‍यात यावी.अप्रशिक्षीत शिक्षकांना सेवानिवृत्‍ती वेतन मिळावे या विविध मागण्‍या मांडल्‍या.
      स्‍वागत महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्‍यक्ष संभाजीराव थोरात यांनी केले. त्‍यांनीही यावेळी चांगले काम करणा-या शिक्षकांना आगावू वेतनवाढ मिळावी,पती पत्‍नी एकत्रीकरणाअंतर्गत एकाच शाळेत शिक्षकांना नेमणूक दयावी अशा विविध मागण्‍या मांडल्‍या.यावेळी विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय काम करणा-या शिक्षकांचाही सत्‍कार केला. राज्‍य महासंघातर्फे  दिनदर्शीका प्रकाशन हे गावाकडचे गाणे या सीडीचे प्रकाशनही करण्‍यात आले. सुत्रसंचालन अभिनेत्री निशीगंधा वाड यांनी केले.आभार कार्याध्‍यक्ष एस.डी.पाटील यांनी मानले.
                                    ******
          


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा