शुक्रवार, १५ जून, २०१२



महाराष्ट्र ही उद्योजकांची पहिली पसंती असल्याचे
‘जीई’ च्या प्रकल्पामुळे सिद्ध : मुख्यमंत्री
पुणे, दि. 15: ‘जीई’ सारख्या प्रतिथयश बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या ऊर्जा उत्पादन प्रकल्पांसाठी महाराष्ट्राची निवड करुन महाराष्ट्र ही मोठ्या उद्योजकांची पहिली पसंती असल्याचे सिद्ध केले आहे. सर्व प्रकारच्या उद्योगांसाठी राज्य सरकारने पुरेशा जमिनीची आणि पायाभूत सुविधांची पूर्ण सिद्धता केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासन आणि जीई इंडिया इंडस्ट्रीयल प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनी बरोबर हॉटेल हयात रिजन्सी येथे सामंजस्य करार झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याने 2005 मध्ये औद्योगिक विशाल प्रकल्प धोरण जाहीर केल्यानंतर आतापर्यंत 335 विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातील एकूण गुंतवणूक दोन लाख 76 हजार 832 कोटी इतकी असून त्यातून 3 लाख 17 हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
       
         राज्यातील 335 प्रकल्पांपैकी 95 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरु झाले आहे. पुणे-मुंबई सारख्या महानगरामध्येच उद्योग केंद्रीत न करता राज्यातील इतर मागास भागात उद्योग उभे राहावेत या उद्देशाने औद्योगिक विशाल प्रकल्प धोरणांतर्गत शासनाने प्रयत्न केले. त्यामुळे 253 प्रकल्प मागास भागात उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
        मूल्याधारित विक्रीकराचा (व्हॅट) परतावा हा विषय काही उद्योजकांना अडचणीचा ठरत असल्याची चर्चा राज्यामध्ये होत आहे. याबाबत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्याच्या प्रस्तावित औद्योगिक धोरणामध्ये याबाबत निश्चितच विचार करण्यात येईल. याबाबत काहीनाकाही तोडगा काढण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. व्हॅटचा परतावा ही अतिशय नाजुक बाब आहे. मार्केटिंग कंपन्या स्थापन करुन दोनदा परतावा मिळण्यासारखे प्रकार घडु नयेत, यासाठी निश्चितपणे तरतुदी करण्यात येतील.
        'विशाल प्रकल्प धोरणांतर्गत' देशी-विदेशी गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात आलेली आहे. जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, डेमलर क्रायसलर, सॅनी  हेवी इंडस्ट्रीज, ब्रिजस्टोन, एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स,  मायको बॉश, बोईंग, इस्सार मॅन्युफॅक्चरींग, हुंडाई हेवी इंडस्ट्रीज, पियाजियो व्हेईकल्स, पॉस्को लि. अशा प्रतिष्ठित कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखीत केले.
        या धोरणांतर्गतच 'जीई ' या नामवंत कंपनीने आपल्या प्रकल्पासाठी पुण्यातील चाकणची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांनी आनंद व्यक्त करुन या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
        'जीई ' चा हा प्रकल्प चाकण येथील औद्योगिक विकास महामंडळ, इंडस्ट्रियल पार्क टप्पा 2 येथे होणार आहे. एकूण 68 एकर एवढया क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार असून 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक ते या प्रकल्पात करणार आहेत.  या प्रकल्पामध्ये उर्जा उत्पादनं, उद्योगांची गरज असलेले पॉवर जनरेटर्स, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन यांचे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये पर्यावरणपुरक तंत्रज्ञान वापर करण्यात येणार आहे. उर्जा साठवून ठेवण्यासाठी हायब्रीड बॅटरी आणि बायोगॅस पॉवर जनरेशन तंत्रज्ञान या प्रकल्पात वापरले जाणार आहे. या प्रकल्पातून दोन हजार रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
     
   'जीई 'चे उपाध्यक्ष जॉन राईस यावेळी बोलताना म्हणाले, स्थानिक पर्यायाचा वापर करुन उत्पादित केलेले सर्वोत्तम गुणवत्तेचे दर्जेदार उत्पादन सातत्याने देशातील नागरिकांपर्यत पोचविण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.  या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने मोलाची मदत केली आहे.
        तत्पूर्वी जीई इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जॉन फ्लॅनेरी आणि राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी यांनी या करारावर सह्या करुन कराराचे परस्परांकडे हस्तांतरण केले.
        यावेळी 'जीई ' इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फ्लॅनेरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रधान सचिव के. शिवाजी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजित कुमार जैन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव व महासंचालक प्रमोद नलावडे, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा