शुक्रवार, ४ मे, २०१२


मुंबईच्या पर्यावरण खात्याशी प्रश्नासंदर्भात

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार

- मुख्यमंत्री


   मुंबई दि. 3 मे   : मुंबईचे अनेक प्रश्न हे केंद्रीय पर्यावरण खात्याशी निगडीत असल्याने या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण उद्याच केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री.जयंती नटराजन यांची दिल्ली येथे भेट घेणार असल्याची ‍माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
   मुंबईतील समस्यांबाबत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांची बैठक मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी बोलाविली होती. या बैठकीस मुंबईतील 48 पैकी 43 आमदार उपस्थित होते. ही बैठक तब्बल सात तास चालली. या बैठकीस मुंबई शहराचे पालकमंत्री श्री.जयंत पाटील, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री श्री.नसीम खान,आरोग्य मंत्री श्री.सुरेश शेट्टी,  महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती वर्षा  गायकवाड, नगरविकास राज्यमंत्री श्री.भास्कर जाधव, गृहनिर्माण राज्यमंत्री श्री.‍ सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.विनोद तावडे, मुख्य सचिव श्री.रत्नाकर गायकवाड, मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.सीताराम कुंटे तसेच विविध विभागांचे  अधिकारी उपसिथत होते.
   अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इंदू मिलची चैत्यभूमी स्मारकासाठी जागा, मुंबईतील नियोजित कोस्टल मार्ग त्याचबरोबर केंद्र शासनाच्या जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन, मिठागरांच्या जागांचा पुनर्विकास, रेल्वे क्रॉसिंगवरील मोठ्या प्रमाणात होणारे रेल्वे अपघात तसेच मुंबईतील प्रवासी वहातुक, मुंबई झोपडपट्टींचा पुनर्विकास, मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास, कोळीवाड्यांचा प्रश्न असे मुंबईशी संबंधित आहेत.  यापूर्वी झालेल्या बैठकीत 155 मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.  त्यातील बहुतांशी मुद्यांची सोडवणूक करण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय पर्यावरण, वस्त्रोद्योग खात्याशी संबंधित प्रश्नांवर आपण पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहोत.  मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईच्या प्रश्नांसंदर्भात आपण सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित बसून प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न करू.  यासाठी पुढील महिन्यातच मुंबईतील आमदारांच्या विभागवार बैठका घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची खोदाई आणि साफसफाई याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 
यावेळी  मुंबईतील विविध प्रश्नांवर आमदार सर्वश्री. जगन्नाथ शेट्टी, कालीदास कोळंबकर, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, मधु चव्हाण, मंगल प्रभात लोढा, अमिन पटेल, गोपाळ शेट्टी, विनोद घोसाळकर, प्रविण दरेकर, सरदार तारासिंग, शिशिर शिंदे, रविंद्र वायकर, राजहंस सिंह, मंगेश सांगळे, रमेशसिंग ठाकूर, योगेश सागर, अस्लम शेख, सुभाष देसाई, अशोक जाधव, कृष्णा हेगडे, राम कदम, प्रकाश मेहता, अबू आझमी, नवाब मलिक, चंद्रकांत हंडोरे, मिलिंद कांबळे, कृपा शंकर सिंह, प्रकाश सावंत, बाबा सिध्दिकी, प्रकाश बिनसाळे, किरण पावसकर, डॉ.दिपक सावंत, कपिल पाटील, भाई जगताप तसेच श्रीमती ॲनी शेखर, श्रीमती विद्या चव्हाण आणि श्रीमती अलका देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
          -----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा