गुरुवार, २६ एप्रिल, २०१२


एस.टी. बस स्थानकांचे आधुनिकीकरण करताना
प्रवाशांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्यावे - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 26: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट प्रवाशांना सुखकर प्रवासाची सुविधा देण्याचे आहे. त्यामुळे एस.टी बस स्थानकांचे आधुनिकीकरण करताना प्रवाशांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्या, असे आदेश आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एस.टी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहन विभागाचे प्रधान सचिव एस.के. शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सचिव नितीन करीर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर व अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील सहा विभागातून ज्या एसटी बस स्थानकांमध्ये येणाऱ्या - जाणाऱ्या बसेसची आणि प्रवाशांची संख्या जास्त आहे, अशा बस स्थानकांचा आधुनिकीकरण करण्यासाठी प्राथम्याने विचार करण्यात यावा.  उपलब्ध जागेतील 70 टक्के जागा बस स्थानकासाठी ठेवून केवळ 30 टक्के जागा  व्यापारी तत्वावर देण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी श्री. चव्हाण यांनी केल्या. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आधुनिकीकरण करताना बसेस उभ्या करण्यासाठी, वळविण्यासाठी तसचे  प्रवाशांना बसण्यासाठी आणि वावरण्यासाठी पुरेशी जागा, विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे, बस वाहक व चालकांसाठी विश्रांतीकक्ष, ऑटोरिक्षा स्टँण्डसाठी जागा, वाहनतळ (पार्किंगसाठी जागा) आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन बिल्डींग बांधण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुचविले. 
महामंडळाने राज्यातील सहा विभागातील प्रत्येकी एका बस स्थानकाचे प्रायोगिक तत्वावर आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव शर्मा यांनी दिली. एमएमआरडीए, सिडको आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त समितीने यासाठी विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यातून पाच संस्थाचे प्रस्ताव निवडण्यात आले आहे. या कपंन्यांनी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी सुचविलेल्या आराखडयांच्या आधारे पुढील काम करण्यात येणार आहे. या कपंन्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. आधुनिकीकरणाच्या कामासाठी जुलै महिन्यात निविदा काढण्यात येणार आहेत. प्राप्त निविदा संबंधी अंतिम निर्णय सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत घेऊन डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असेही श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद, कराड, नाशिक, रत्नागिरीमधील  बस स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावित आराखडयात सादरीकरण यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा