बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२



माध्यमांच्या ताकदीचा वापर
जबाबदारीने व्हावा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 29: आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिडीयाची ताकद वाढली आहे. या ताकदीचा वापर जबाबदारीने केल्यास समाजाचे हित नक्कीच साधले जाईल. त्यादृष्टीने मिडीयाचा वापर व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली.
          मंत्रालयातील नुतनीकरण केलेल्या पत्रकार कक्षाचे उद् घाटन मुख्यमंत्री श्री.चव्हाण व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यानिमित्त मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास श्री. पवार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, कार्यवाह संजीव शिवडेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की, मंत्रालयात असलेल्या सहाव्या मजल्याइतकेच तळ मजल्यालाही महत्व आहे. कारण शासनाने घेतलेले लोकोपयोगी निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव करीत असतात. हल्लीच्या आधुनिक युगात माध्यमांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्याने काही सेकंदात बातमी झळकते. त्यामुळे समाजात मिडीयाचे महत्व वाढले आहे. इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानामुळे तर माध्यमांची ताकद कमालीची वाढली आहे. या ताकदीचा वापर समाजहितासाठी जबाबदारपणे केला जावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकारांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन नेहमीच सहनुभूतीपुर्वक विचार करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          उपमुख्यमंत्री म्हणाले की, आधुनिकीकरणामुळे कामाला गती येते. पत्रकारांना आधुनिक सोयी मिळाल्यास शासनाचे विविध लोकोपयोगी निर्णय बातमीच्या स्वरुपात नागरिकांपर्यंत पोहोचविणे सुलभ होते. मंत्रालयातील पत्रकार कक्षाचे नुतनीकरण झाले त्याचप्रमाणे अन्य विभागांचेही अशाचप्रकारे नुतनीकरण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. गांगण यांनी प्रास्ताविक केले. संघाचे माजी अध्यक्ष अनिकेत जोशी यांच्या हस्ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. माहिती महासंचालक प्रमोद नलावडे यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार कक्षाच्या नुतनीकरणासाठी सहाय्य केलेल्या वास्तुविशारद अनंत गाडगीळ, अश्विनी देशपांडे, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे प्रा. साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे देविदास मुळे, माहिती व जनसंपर्कचे कर्मचारी सुनील खाडे, कंत्राटदार तेजस आशर यांचा  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमास पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. संजीवशिवडेकर यांनी आभार मानले.
00000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा