युरोपियन युनियनचे अध्यक्ष
मुख्यमंत्र्यांना भेटले
मुंबई, दि. 13 फेब्रुवारी : युरोपियन युनियनमधील राष्ट्रे आणि महाराष्ट्र यांच्यात विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य तसेच गुंतवणुकीतून उत्तम संबंध निर्माण व्हावेत आणि दरवर्षी या अनुषंगाने समिटचे आयोजन व्हावे अशी इच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. युरोपियन युनियनच्या युरोपियन कमिशनचे अध्यक्ष श्री.जोझ मॅन्युएल बरोसो यांच्यासमवेत आज सकाळी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी मुंबई व महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात दाखविलेल्या उत्सुकतेबद्दल त्यांना प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. युरोपियन युनियन-इंडिया समिटसाठी श्री.बरोसो भारतात आले असून या दौऱ्यात त्यांनी मुंबई भेटीचे विशेष आयोजन केले होते. यावेळी बोलताना श्री.बरोसो यांनी सांगितले की, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे महत्व युरोपियन युनियनला माहित असून या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग व व्यापार तसेच विशेषत: ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कौशल्य विकास या क्षेत्रात परस्पर समन्वयाच्या अनेक संधी आहेत.
मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी राज्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीविषयी शिष्टमंडळाला विस्तृत माहिती दिली व मुंबईतील पायाभूत सुविधा, कलासंस्कृती, क्रीडा व शिक्षण या क्षेत्रात युरोपियन युनियनने जास्तीत जास्त गुंतवणूक करावी तसेच युनियनचे कार्यालयही मुंबईत सुरु करण्याविषयी विचार करावा असे सांगितले.
या शिष्टमंडळात युरोपियन कमिशनचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डेव्हीड ओ’सुलिवॅन, डिप्लोमॅटिक ॲडव्हायझर ह्यूगो सोब्रॅल आदी तसेच राज्य शासनाकडून राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजित कुमार जैन, उद्योग विभागाचे प्रधान प्रधान सचिव के.छत्रपती, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते.
-----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा