रविवार, २७ नोव्हेंबर, २०११




स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांनी जनजागृती करावी
- मुख्यमंत्री
मुंबई, दि.27 : मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असून ती एक सामाजिक समस्या बनली आहे. स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे उपाययोजना होत असून स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
वांद्रे येथील हॉटेल ताज लँड एन्डस येथे फेडरेशन ऑफ ऑबेसेटीक अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि मुंबई ऑबेसेटीक अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने, `ॲडव्हान्स इनफर्टीलिटी मॅनेजमेंट` या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.बी.के.गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री.अरुण खन्ना, डॉ.नंदिता पालशेतकर, डॉ.ऋषिकेश पै, डॉ.पी.सी.महापात्रा, डॉ.नोशन शेरीगॉन आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
    मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वंधत्वनिवारणाच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे अपत्यहीन दाम्पत्यांच्या जीवनात आशेची नवी पहाट उगवली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानामुळे सामान्यांचे जीवन आरोग्यदायी होण्यास मदत झाले आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रातील वापर प्रसुतिपूर्व गर्भलिंग निदानासाठी केला जातो आणि त्यानंतर होणाऱ्या स्त्रीभ्रृण हत्येमुळे समाजातील मुलीचा जन्मदर घटत आहे. मुलगाच हवा या अट्टाहासापायी महिलेवर कुटुंबातुनच मानसिक दबाव आणला जातो. स्त्रीभ्रृण हत्येसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी शासनस्तरावर होत आहे. मात्र या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी शिबिरे, मेळावे घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.  तरुण पिढीने मुलभूत विज्ञानाच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत करावे. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात अनेक नव-नवीन संशोधन केले जात आहे. पुणे हे तर बायोटेक हब बनले आहे ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा मानवी जीवन सुकर आणि निरोगी होण्यासाठी असायला हवा या तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी आचारसंहिता असायला हवी म्हणजेच स्त्रीभ्रृण हत्येसारखी गंभीर समस्या निर्माण होणार नाही. या परिषदेसाठी मुंबईची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
परिषदेला उपस्थित आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा यावेळी सत्कार करण्यात आला डॉ.महापात्रा, डॉ.गोयल आदींची याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. डॉ. पालशेतकर यांनी प्रस्तावित केले.
-----

विसंअ अजय जाधव/पोटे/27.11.2011

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा