शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११



26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली

   मुंबई, दि. 26 : 26/11 च्या दहशतवादी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व जवानांना भावपूर्ण वातावरणात आज राज्यपाल के.शंकरानारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस जिमखाना येथे उभारण्यात आलेल्या शहीदांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
   यावेळी गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, महिला बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव, खासदार निलेश राणे, आमदार भाई जगताप, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, रामदास आठवले, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी शहीदांचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0



  
क्रॉफर्ड मार्केट परिसरातील व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

    मुंबई, दि. 26 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दुपारी क्रॉफर्ड मार्केट परिसराला भेट देऊन भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आज पहाटेच्या सुमारास या भागातील सारा-सहारा, मोथा मार्केट आणि मनिष मार्केट या ठिकाणी मोठी आग लागली होती. दुपारपर्यंत या आगीवर काबू मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. या आगीत अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने जळाली आणि करोडो रुपयांचे नुकसान झाले असा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुकानदारांना दिलासा देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच महानगरपालिकेच्या आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मदत कार्याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे या आगीच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
   यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 0 0 0 0
  

कायदे परिणामकारकरित्या अंमलात यावेत- मुख्यमंत्री
      
   मुंबई, दि. 26 : न्यायदान प्रक्रियेत विलंब न होता दोषी व्यक्तीस वेळेत शिक्षा व्हावी अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी कायदे परिणामकारकरित्या अंमलात यावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
    मुंबई व गोवा या दोन राज्यांच्या बार कौन्सिलला 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने दादर येथे 26 नोव्हेंबर या "विधी दिनी"  "सामान्य माणसाच्या न्याय व्यवस्थेकडून अपेक्षा व 21 व्या शतकात न्याय व्यवस्थेसमोरील आव्हाने" या विषयावर राज्यातील वकिलांच्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. कालानुरुप काही कायद्यांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तसेच न्यायदान व्यवस्था ही जागतिक आव्हानांशी सामना करण्यास सक्षम असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
    गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोवा मुक्ती व बार कौन्सिल या दोहोंना 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गोवा विकास परिषद "व्हिजन-2035" राबविणार असल्याचे यावेळी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाल्याबद्दल न्या. रंजना देसाई यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. न्या. रंजना देसाई यांनी सामान्य माणूस न्यायापासून वंचित राहू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
    महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष अनिल सिंग यांनी न्यायालयांना पायाभूत सुविधा चांगल्या प्रमाणात पुरविल्या जाव्यात, यासाठी समन्वय समिती स्थापन व्हावी, अशी सूचना केली. नाशिक, सोलापूर व गोवा येथे बार कौन्सिलने आयोजित केलेल्या परिषदांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे व मुख्यमंत्री चव्हाण हे नियमितपणे बार कौन्सिलच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
    सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आर.एम.लोढा यांनी वकिलांनी युक्तीवादात जास्त वेळ घालवून न्यायदानास विलंब करु नये. दावे जलदगतीने निकाली काढावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.  मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मोहित शहा यांनी न्यायदान प्रक्रियेत पारदर्शकता व जबादारीचे भान असावे, असे सांगून सकाळ-संध्याकाळ कोर्ट, लोक अदालती व समझौता केंद्र याद्वारे जलदगतीने सामान्य माणसास न्याय मिळावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
    या परिषदेस न्या.एस.सी.धर्माधिकारी, राम जेठमलानी व विधी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. कौन्सिलचे उपाध्यक्ष आशिष देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 0 0 0 0




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा