बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

रेल्वे राज्यमंत्री के. एच. मुनीअप्पा आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट


चाळीस लाख लोकल प्रवाशांच्या सुविधा
वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
      मुंबई, दि. 12 : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेतून नोकरी-रोजगारानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 40 लाख चाकरमान्यांसाठी हा प्रवास आता आरामदायी होणार आहे.  याला कारण झाली आहे  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री के. एच. मुनीअप्पा आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज मंत्रालयात झालेली भेट. 
या भेटीत मुंबईच्या उपनगरी गाड्यांतील दुसऱ्या दर्जाच्या डब्यातील बैठकांना कुशनची सोय करण्याची विनंती  श्री. चव्हाण यांनी केली. त्यावर श्री.मुनीअप्पा यांनी त्याला अनुकुलता दर्शवून ही बाब शक्य असल्याचे आणि आपण यात प्राधान्याने लक्ष घालु, असे  मुख्यमंत्र्यांना सांगितले.
          मुंबई भेटीवर आलेले श्री.मुनीअप्पा यांनी श्री.चव्हाण यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.  यावेळी उभय नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारने राज्यातील रेल्वे प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावा, असे श्री. मुनीअप्पा यांनी सांगितले. यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री.एस.के.जैन आणि मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक एस. व्ही. आर्या उपस्थित होते.
मुंबईच्या उपनगरी वाहतुकीचा प्रश्न चर्चेला आला, तेव्हा उपनगरी रेल्वेतून रोज चाळीस लाखांहून अधिक लोक दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करतात. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी  बाकांना कुशन लावल्यास खुप मोठी सोय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी श्री. मुनीअप्पा यांना सांगितले. ही बाब आपण प्राधान्याने हाती घेऊ, असे आश्वासन श्री. मुनीअप्पा यांनी दिले.
000000



क्रीडा क्षेत्रात नाव उज्ज्‍वल करणाऱ्या
खेळाडूंना शासनाचे सर्व प्रकारचे सहाय्य
मुख्यमंत्र्याच्या हस्ते 21 खेळाडुंचा सत्कार
            मुंबई, दि.12 : आज महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावित आहेत. महाराष्ट्रात असेच दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनामार्फत सर्व प्रकारची मदत राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना करण्यात येईल. राज्य क्रीडा विकास निधीतून उदयोन्मुख खेळाडूंना मिळालेले अर्थसहाय्य निश्चितच पुढील कामगिरीसाठी कामी येईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विविध क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू शकणाऱ्या आणि चमक दाखविलेल्या 21 खेळाडूंचा सत्कार आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमास क्रीडा मंत्री पद्माकर वळवी क्रीडा राज्यमंत्री भास्कर जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमात क्रीडा विकास निधीमधून 21 उदयोन्मुख खेळाडूंना मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की आज महाराष्ट्रातील अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाद्वारे स्वत:चा ठसा उमटवित आहेत. त्‍यामुळेच या उदयोन्मुख खेळाडूंकडून आपल्या सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत. मला विश्वास आहे की आगामी स्पर्धेत प्रत्येक खेळाडू उत्तम कामगिरी करेल. यापुढील  काळातही शासन खेळाडूंच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना सर्वतोपरी सहाय्य करेल.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित उदयोन्मुख खेळाडूचे कौतुक करताना त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक कोण आहेत, संबंधित खेळाडू आपल्या खेळाची प्रॅक्टीस कुठे करतात याची जातीने चौकशी केली. तर जे खेळाडू आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या पालकांचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या मुलांना खेळाकडे लक्ष देण्यासाठी पाठिंबा द्यावा असेही सांगितले.
                        शासनामार्फत आज राज्य क्रीडा विकास निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात आलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
            कु. स्वप्नाली यादव, मुंबई (जलतरण, खाडी पोहणे) 3 लाख रुपये, कु. आरती घोरपडे, पुणे (जलतरण) 3 लाख रुपये, कु. श्रिया विध्दांस, मुंबई (थलेटिक्स) 2.50 लाख रुपये, फुलचंद बांगर, कोल्हापूर (शूटिंग) 2 लाख रुपये, कॅप्टन अर्जुन पाटील, पुणे (अश्वारोहण)       2 लाख रुपये, सुहास खामकर, (बॉडी बिल्डींग) 2 लाख रुपये, राहूल आवारे , पुणे (कुस्ती)     2 लाख रुपये, कु. मिनल विशे, कल्याण (वेटलिफ्टींग) 2 लाख रुपये, अतुल सिन्हा (सेलिंग)  3 लाख रुपये, दुर्गेश पाल (थलेटिक्स) 1.50 लाख रुपये, कु. रुचा पुजारी (बुद्धीबळ) 1 लाख रुपये, कौस्तुभ भोसले (आर्चरी) 1 लाख रुपये, संदीप गवई (आर्चरी) 1 लाख रुपये, स्वप्नील धोपाडे, अमरावती (बुद्धीबळ) 2 लाख रुपये, कु. कल्पना सावंत, मुंबई (पॉवर लिफ्टिंग) 2.50 लाख रुपये, अजिंक्य दुधारे, नाशिक (तलवारबाजी) 1 लाख रुपये, राजेश यादव, पुणे (रोईंग)    3 लाख रुपये, माऊंटेनियर्स असोसिएशन, रत्नागिरी  4 लाख रुपये, कु. रोशनी रिंके अपंग खेळाडू 1 लाख रुपये, कु. राही सरनोबत, कोल्हापूर (नेमबाजी) 15 लाख रुपये, कु. अफिफा खान, (स्केटिंग) 50 हजार रुपये. तसेच हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी 3 लाख रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. आज एकूण 63 लाख रुपयांचा निधी या खेळाडूंना देण्यात आला.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: