शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

शासन शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी - मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस
शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी सोबत प्रदीर्घ चर्चा
            नागपूर, दि.28 :  शासन शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे आहे. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज रामगिरी येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी व पदाधिकारी यांचेसोबत राज्यातील कापूस, धान व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत प्रदीर्घ चर्चा करतांना दिली.
            मुख्यमंत्र्यांना शरद जोशी यांच्या नेत्रृत्वात शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी भेटले. यात शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. वामनराव चटप, राम नेवले, श्रीमती सरोज काशीकर, श्रीमती शैला देशपांडे, अनंत देशपांडे, गुणवंत पाटील, दिनेश शर्मा, शिवाजीराव शिंदे, रमेश पाटील या नेत्यांचा समावेश होता. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
 शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पंपची योजना
5 लाख सोलर पंप पहिल्या टप्प्यात देणार
            ज्या शेतकऱ्यांचे वीज बील थकीत आहे त्यांची वीज जोडणी कापणार नाही. यापुढे विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयात तसेच मराठवाडयात शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पंप देण्याची शासनाने योजना आखली असून त्याप्रमाणे लवकरच कामास सुरुवात करित आहोत. पहिल्या टप्प्यात 5 हार्स पॉवरचे 5 लाख सोलर पंप शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी विविध कंपन्याकडून निवीदा मागविण्यात आल्या असून 5 ते 7 वर्षाच्या सर्व्हिस खात्रीसह पंप खरेदी करण्यात येईल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक पाऊल उचलेल. यासाठी थोडा वेळ द्यावा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शिष्ट मंडळाला केले.
            तब्बल 45 मिनिटे चाललेल्या या चर्चेत शिष्टमंडळासोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्यात 2065 हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यासोबतच माती परिक्षणावरही भर देण्यात येईल. त्यामुळे कोणत्या जमिनीत कुठले पीक घ्यायचे याचे मॉडेल तयार करण्यात येणार आहे. शेतीच्या क्षेत्रात मुळातच नव्याने सर्व साधनसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत विचार करण्यात यावा, असेही यावेळी चर्चेत सांगण्यात आले.
            कापूस, सोयाबीन व धानाला प्रति क्विंटल चांगला भाव देण्याची मागणी तत्वत: मान्य आहे. यासाठी केंद्राकडे मागणी करण्यात येईल. येत्या 7 डिसेंबरला या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसोबत चर्चा करण्यात येईल व त्यांचेकडे 4500 कोटी रुपयांची राज्याला मदतीची मागणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी चर्चेच्या वेळी सांगितले.
            साप चावून जर शेतकऱ्यास मृत्यू आला तर शासनातर्फे त्यांना एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी ॲड. वामनराव चटप यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तत्वत: मान्य केली. तसेच जंगलाला लागून असलेल्या शेत जमिनीतील पिकांचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी सोलर कुंपनाची योजना राबवावी अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. शेतकरी संघटनेने येत्या 30 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेले राज्यव्यापी ठिय्या आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी यावेळी शरद जोशी यांना केले.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा