गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी सक्षम पिढी
घडविण्याचे आव्हान शिक्षकांनी पेलावे
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा
मुंबई दि. 4 : यापुढील जग हे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबुन असणार आहे. त्यादृष्टीने सक्षम पिढी घडविण्याचे व ज्ञानसंपन्न समाजनिर्मितीचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. यामध्ये सेवाभाव आणि व्रतस्थवृत्तीने ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची भूमीका महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, भारतीय शिक्षण परंपरेत आई-वडिलानंतर गुरु किंवा शिक्षकाला महत्वाचे स्थान आहे. समाज घडविण्याच्या प्रक्रीयेत शिक्षक एक महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यात ज्ञान, आस्था, ध्येय, सवयी आणि सामर्थ्य याचा विकास करण्याचे कार्य शिक्षक करतात. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना आणि सामाजिक मुल्यांना अनेक मार्गांनी धक्का लावण्याचे प्रयत्न होत असताना संवेदनशील नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाला विशेष महत्व आहे.
 आज गुरू-शिष्य संबंधातील भावनेचा धागा तोच असला तरी शैक्षणिक क्षेत्रातील संदर्भ वेगाने बदलत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संशोधनामुळे ज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत आहेत. बोटाच्या एका क्लिकवर जगातील ज्ञान आले आहे. तर दुसरीकडे मुल्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. अशावेळी जीवनाला सकारात्मक रितीने सामोरे जाण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य शिक्षकांना करावे लागेल.
शिक्षकांकडून प्रभावी कार्याची अपेक्षा करताना शिक्षकांच्या समस्या सोडवून चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र पुरोगामी आणि विकासाच्या संदर्भात अग्रेसर असणारे राज्य आहे. राज्याची ओळख अधिक ठळकपणे पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. या पिढीतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षक करत आहेत. बलशाली आणि प्रगत राष्ट्राचा तेवढाच मजबूत आधार रचण्याचे त्यांचे कार्य असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा