शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

राज्यातील 36वा पालघर जिल्हा अस्तित्वात
पालघर या आदिवासीबहुल नवीन जिल्ह्याचा विकास
आदिवासी विकासाची देशातील प्रयोगशाळा ठरेल : मुख्यमंत्री
ठाणे, दि.1 : पालघर या आदिवासीबहुल जिल्हयाचा सर्वांगिण विकास करताना इथल्या आदिवासी बांधवांची सांस्कृतिक ओळख पुसली जाणार नाही, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल आणि हा जिल्हा आदिवासी विकासाची देशातील प्रयोगशाळा ठरेल, असा ठाम आत्मविश्वास मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पालघर येथे व्यक्त केला.
देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन आज पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा अस्तित्वात आला. या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघरमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, विविध लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, या जिल्ह्यातील सर्व तालुके हे सहापदरी पक्क्या रस्त्याने जोडले जातील. त्यामुळे औद्योगिकरणास चालना मिळेल. नवे उद्योग येथे येतील आणि जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळेल. नवीन प्रशासकीय कार्यालयाची निर्मिती करताना अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशी ती होतील याकडे विशेष लक्ष राहील. महसूल प्रशासनाचा पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार येथून चालेल अशी व्यवस्था रु.  हा जिल्हा भारतातील विकसित झालेला सर्वोत्तम जिल्हा करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल. पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येथे सागरी सुरक्षा ॲकॅडमी स्थापन करण्यात येणार आहे. मासळी निर्यात करणे, नारळ संशोधन केंद्र असे अनेक नवे प्रकल्प भविष्यात येथे सुरू करण्यात येणार आहेत.

आरोग्याच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, कुपोषण कमी झाले आहे. माता मृत्यूदर कमी झाला, राजमाता जिजाऊ मिशनची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. औद्योगिकरणाचा नवा कॉरिडोअर मार्ग येथूनच जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगाला चालना मिळेल. वेगळा रेल्वे मार्ग तयार होईल. फलोत्पादनात हा जिल्हा आघाडीवर राहील. पर्यटन स्थळे चांगली आहेत. रमणीय, सुंदर समुद्र किनारे लाभले आहेत. त्यामुळे आता पर्यटकांची संख्या वाढून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
महसूल विभागाने संगणकाच्या माध्यमातून जवळपास ३५ प्रकारचे दाखले देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना लॅपटॉप देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांची पिळवणुक थांबली पाहिजे, लोकांना प्रशासन आपले वाटले पाहिजे अशा दृष्टीने काम करण्याचे  आदेश मी सूत्रे घेतली तेव्हाच मुख्य सचिवांपासून ते सर्वात खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले होते. गतिमान आणि पारदर्शक कारभार असलेल्या समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न आम्हाला साकार करायचे आहे आणि आम्ही ते निश्चितच पूर्ण करु.
यावेळी पालकमंत्री श्री. गणेश नाईक म्हणाले की, ठाण्यातील आदिवासी विभागाचे कार्यालय जव्हार येथे नेणे गरजेचे आहे. नवीन जिल्ह्यामुळे येथील सागरी, नागरी, आगरी आणि आदिवासींचा विकास झपाट्याने होईल.
महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले की, जव्हार येथील आदिवासींच्या विकासासाठी असलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अधिक सक्षम करण्यासाठी शासन मदत करेल. महसूल विभागाने आता ऑनलाईन डॉक्युमेंटेशन देण्याचे काम सुरु  केले आहे. त्यामुळे प्रशासन गतीमान होईल अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल.

श्री. डावखरे आणि श्री. गावीत यांनी नवीन जिल्हा झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून पालघरच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मुख्य सचिव श्री.स्वाधीन क्षत्रिय यांनी प्रास्ताविकात जिल्हा निर्मिती मागील राज्यातील शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर दहा जणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुटुंब दाखले देण्यात आले. यावेळी महसूल दिनाचे निमित्त साधून सुरु  केलेल्या -स्कॅनिंग, -म्युटेशन, ठाणे प्रतिबिंब (किऑस्क), परिवार कवच (कुटुंब दाखले पुस्तिका) या लोकाभिमुख योजनांचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार चिंतामण वनगा, खा. कपिल पाटील, . विवेक पंडित, . आनंद ठाकूर, . विष्णू सावरा, . मुज्जफर हुसेन, . विलास तरे, . क्षितीज ठाकूर, नगराध्यक्षा श्रीमती प्रियंका पाटील, विभागीय आयुक्त श्री. राधेशाम मोपलवार, जिल्हाधिकारी श्री. पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड, नामनिर्देशित जिल्हाधिकारी अभिजित बांगर सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा