शुक्रवार, २७ जून, २०१४

एमएमआरडीएच्या रु. ४ हजार २४० कोटी रुपयांच्या
अर्थसंकल्पाला मंजुरी : पायाभूत सुविधांवर भर – मुख्यमंत्री

मुंबई, दि.27: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०१४-१५साठीच्या ४ हजार २४० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आज प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेलया बैठकीत मंजुरी देण्यात आली. महामुंबईतील मेट्रो, मोनो, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठी यात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. प्रगतीपथावरील व प्रस्तावित प्रकल्प प्राधिकरणाने नियोजित वेळेत पूर्ण करुन नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत उपलब्ध करुन द्याव्यात, असे यावेळी श्री. चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 134 वी बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुंबईचे महापौर सुनिल प्रभू, आमदार नवाब मलिक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रकाश बिनसाळे, मुख्य सचिव जे.एस.सहारिया, महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाचे आयुक्त यु.पी.एस. मदान, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे,  तसेच प्राधिकरण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन कामे हाती घेताना त्यासाठी लागणारे जमीन संपादन वेळैत पुर्ण करावे. तसेच यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतुद प्रकल्पाच्या किंमतीमध्ये समाविष्ट करावी. नवीन कामे हाती घेताना त्याचा मास्टर प्लॅन तयार करावा. विकास कामे करताना त्याचा सामुहिक विकास होईल, या दृष्टीने नियोजन करावे.
मेट्रो, मोनोरेल,सांताक्रूझ चेंबूर जोड रस्ता, अमर महल जंक्शन येथील उड्डाणपूल, पूर्व मूक्त मार्ग, मिलन रेल्वे ओलांडणी पूल, खेरवाडी उड्डाण पूल आणि सहार उन्नत मार्ग असे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे मुंबई शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबई शहर जागतिक दर्जाचे होण्यास मदत होत आहे. यापुढील प्रस्तावित प्रकल्पही प्राधिकरणाने नियोजित वेळेत पुर्ण करुन नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आज मंजूर केलेल्या 2014-15 च्या अर्थसंकल्पात 3,628 कोटीच्या विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाला प्राधिकरणाने मंजूरी दिली. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये महत्वाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. यामध्ये चार उड्डाणपूल, रेवस पासून कारंजापर्यंत जाणारा रेवस खाडी पूल आणि माणकोली- मोटेगाव आणि उल्हास खाडीजवळील कल्याण- भिंवडी रस्ता येथील दोन पुलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग-4 वरील टक्का कॉलनी ते पळस्पे फाटा, खोपोली शहर वळण रस्ता, भिंवडी वळण रस्ता, कल्याण वळण रस्ता आणि शिरगाव फाटा आणि बदलापूरला जोडणाऱ्या जोडरस्त्याचाही यात समावेश आहे.  मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई शहरामध्ये उड्डाणपूल आणि रस्ते विकासासाठी 215 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
        मुंबई मेट्रो रेल प्रकल्पासाठी 634 कोटींची तरतूद करताना अर्थसंकल्पामध्ये कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो मार्गासाठी  500 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 2 साठी अर्थसंकल्पामध्ये 1 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सन 2014-15 मध्ये मुंबई रेल विकास महामंडळातर्फे नवीन रेल्वे गाड्या खरेदी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महानगर पालिकांचे महापौर, नगर परिषदेचे अध्यक्ष तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. 
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा