शुक्रवार, २३ मे, २०१४

माधव मंत्री यांच्या निधनाने चांगला क्रीडा संघटक गमावला : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 : भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष माधव मंत्री यांच्या निधनाने एका चांगल्या खेळाडूसोबतच उत्कृष्ट क्रीडा संघटक गमावला आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मुंबई संघाला रणजी करंडक स्पर्धेत तीनदा विजेतेपद मिळवून देण्याची लक्षणीय कामगिरी करण्यासोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळतांना त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण होते.  क्रिकेटच्या विकासासाठी ते अखेरपर्यंत कटिबध्द होते.  त्यांच्या निधनाने देशातील क्रिकेटपटूंच्या पहिल्या पिढीतील एक चांगला सलामीवीर व यष्टीरक्षक आपण गमावला आहे.
----0-----
आनंद मोडक यांच्या निधनाने प्रयोगशील संगीतकार गमावला : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 : ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांच्या निधनाने एक प्रयोगशील संगीतकार गमावला असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, आनंद मोडक यांची संगीताच्या क्षेत्रातील वाटचाल निष्ठापूर्ण होती.  नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी आपल्या संगीताचा स्वतंत्र ठसा उमटविला. श्री. मोडक यांची चौकट राजा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, एक होता विदूषक आदी चित्रपटांची गीते त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेची झलक दाखविणारी आहेत. राज्य शासनाच्या विविध पुरस्कारांवर आपली मोहर उमटविणाऱ्या मोडक यांच्या संगीताने अलिकडेच प्रसिध्द झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील चित्रपटाला समुचित साज चढविला.
-----०-----


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा