गुरुवार, २९ मे, २०१४

10 टक्के कृषी विकास दरवाढीचे उद्दिष्ट गाठणार - मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 29: हवामान बदलामुळे नैसर्गिक संकटे वाढली असली तरी बळीराजाचे कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याच्या जोरावर 10 टक्के कृषी विकास दराचे उद्दिष्ट निश्चितच गाठू, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
          कृषी व पणन विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उप मुख्यमंत्री अजित पवार, कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक मुंबईतील यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाली.         
राज्यातील जवळजवळ दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम पीक घेतले जाते. कृषी नियोजनासाठी हा हंगाम सर्वात महत्वपूर्ण असतो. त्यामुळे या हंगामाचे पूर्ण नियोजन होणे आवश्यक असल्याचे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले, विभागवार बैठकीत अशा पध्दतीचे नियोजन करण्यात काही अडचणी येत होत्या. म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर खरीप हंगामपूर्व बैठक घेण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेण्यात आला आणि या जिल्हास्तरीय बैठका खूपच फलदायी ठरत असल्याचे निदर्शनास आले.
श्री. चव्हाण म्हणाले की, हवामान बदलामुळे अनेकदा राज्यावर दुष्काळाचे सावट आले. गेल्या वर्षीही एकाच वर्षात आपल्याला दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी यांना सामोरे जावे लागले. गेल्या शंभर वर्षात अशी गारपीट कधीच झाली नव्हती, अशी गारपीट गेल्यावर्षी झाली आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांसाठी मदत पुनवर्सन विभागामार्फत 6635 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली. यावर्षी सुध्दा आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र या सर्व बाबी गृहीत धरुन खते, बियाणे,पतपुरवठा आणि वीज उपलब्धता यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. टोल फ्री क्रमांक, भरारी पथके यामुळे काळाबाजार रोखण्यात यश आले असून खत आणि बियाणे यांचा काळाबाजार करणाऱ्या 10 हजार विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
फेब्रुवारी 2014 मध्ये नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी वसंत या प्रदर्शनास 7 लाख शेतकऱ्यांनी भेट दिली. याचाच अर्थ आजचा शेतकरी तांत्रिक ज्ञानाबाबत जागृत झाला असून नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
          उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 2012-13 व 13-14 या दोन आर्थिक वर्षात थकलेले सूक्ष्म आणि ठिबक  सिंचनाचे 1300 कोटी रुपयाचे अनुदान त्वरीत वितरीत करण्याबाबत प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीज जोडण्याना प्राधान्य दिले जाईल. कमी बि-बियाणे आणि खते वापरुन जास्त उत्पादन देणारे वाण निर्माण करण्यासाठी कृर्षी विद्यापीठाने संशोधन करणे आवश्यक असून कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या पीक वाढीसाठी मार्गदर्शन करावे. या बैठकीत उन्हाळी धान खरेदीबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना उप मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले. औरंगाबाद येथील शेतकऱ्यांना  बीबीएफ प्लॅन्टरचा चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. या प्लॅन्टरचा उपयोग शेतकऱ्यानी राज्यात सर्वत्र करुन कृषी उत्पादन वाढवावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
                  कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकेत त्यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे 40 लाख हेक्टरवर दुष्परिणाम झाला असला तरी कृषी उत्पादनात या वर्षी शेतकऱ्यांनी आघाडी कायम राखली आणि उत्पादनाचे विक्रम मोडले असल्याचेही सांगितले. राज्यात 2014-15 या आर्थिक वर्षात सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरावे याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. कृषी मंत्र्यांनी खरीप 2014-15 साठी रासायनिक खते, बियाणांची मागणी व उपलब्धता, बियाणे व खत पुरवठा, कापूस, भात, सोयाबीन, हरभरा, तूर व फळपीकांसाठी कृषी विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. या खरीप आढावा बैठकीत विभागनिहाय पिकांचा आढावा तसेच पिकांसाठी आवश्यक असणारा निधी, खत, बियाणे याबाबतची माहिती सर्व विभागीय आयुक्तांनी दिली.
                   यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पशुसंवर्धनमंत्री मधुकर चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख्, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम ) जयदत्त क्षीरसागर, महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड,पर्यावरण मंत्री संजय देवतळे, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी,  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलिप सोपल तसेच राज्यमंत्री सर्वश्री संजय सावकारे, राजेंद्र मुळक, सतेज ऊर्फ बंटी पाटील, डी.पी.सावंत, सुरेश धस, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, मुख्य सचिव जे.एस.सहारिया, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यावेळी उपस्थित होते.

                             ****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा