शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

आर्थिक अडचणीतील सुतगिरण्यांना मदतीसंदर्भात विचार - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7 : विदर्भ आणि मराठवाड्यात वस्त्रोद्योगाला चालना देऊन राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्याचे, तसेच त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने तेथील आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या सहकारी सुतगिरण्यांना काही  मदत देता येईल का, यासंदर्भात विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज वस्त्रोद्योग विभागाला दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज वर्ध्यातील इंदिरा सहकारी सुतगिरणीबाबत बैठक घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अजितकुमार जैन, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक व्ही. के. अग्रवाल, वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव श्री. कुरसंगे, इंदिरा सहकारी बँकेचे संचालक शेखर शेंडे, प्रविण हिवरे आदी उपस्थित होते.
कर्जाच्या बोजामुळे वर्ध्यातील इंदिरा सहकारी सुतगिरणी अडचणीत आली असून राज्य सहकारी बँकेने कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई तात्पुरती थांबवावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. विदर्भ आणि मराठवाडा या कापूस उत्पादक क्षेत्रात वस्त्रोद्योग धोरणांतर्गत भरीव सवलतीही देण्यात आल्या आहेत. पण कर्ज आणि व्याजाचा वाढता बोजा आदी काही कारणास्तव विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक सहकारी सुतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांमार्फत काही सुतगिरण्यांची विक्री झाली असून काही सुतगिरण्या विक्रीच्या प्रक्रियेत आहेत. या भागातील वस्त्रोद्योग, तसेच रोजगार वाचविण्यासाठी सहकारी सुतगिरण्यांना कर्जमुक्त करणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री श्री. चव्हाण यावेळी म्हणाले. 
संबंधीत सुतगिरणी, राज्य शासन आणि कर्ज पुरवठा करणारी वित्तीय संस्था यांच्या समन्वयातून या सहकारी सुतगिरण्यांना कर्जमुक्त करता येईल. यासाठी शासनामार्फत विदर्भ, मराठवाड्यातील सहकारी सुतगिरण्यांना मदतीचे पॅकेज देता येईल का याची पडताळणी करुन तसा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी दिले. सहकारी सुतगिरण्या चालल्या पाहिजेत अशी शासनाची भूमिका असून त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करु, असे यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा