गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

मुख्यमंत्री सचिवालय पुन्हा ‘सहाव्या मजल्या’वर कार्यरत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत साधेपणाने
नवीन कार्यालयात कामाला केली सुरुवात
          मुंबई, दि.२० : मंत्रालयातील २१ जून २०१२च्या अग्नितांडवांनतर मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण आज पुन्हा ‘सहाव्या मजल्या’वर कार्यरत झाले. महाराष्ट्राचा मानबिंदु आणि प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाचे महाराष्ट्राच्या समाजमनात एक वेगळे स्थान आहे. त्यातही मुख्यमंत्री सचिवालय असलेल्या ‘सहाव्या मजल्या’ला विशेष महत्व आहे. श्री. चव्हाण यांनी आज अद्ययावत नूतनीकरण झालेल्या सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात अत्यंत साधेपणाने प्रवेश केला आणि कामकाजाला सुरुवात केली. दालनात काही काळ काम केल्यावर त्यांनी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत समिती कक्षात राज्य वन्यजीव सल्लागार समितीची बैठक घेतली.
वन मंत्री डॉ.पंतगराव कदम, आमदार कालीदास कोळंबकर व श्री. दिलीप माने तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजितकुमार जैन व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह व वन विभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी यावेळी उपस्थित होते.

मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री सचिवालयातील कक्ष विखुरलेले होते. सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालयाची जागा सुमारे २१ हजार २०० चौरस फुट एवढी होती. मुख्यमंत्री सचिवालयात एकूण ४० अधिकारी आणि १०० कर्मचारी कार्यरत आहेत. यात मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सह सचिव, उप सचिव, खाजगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी, उप संचालक (निधी), अवर सचिव, जनसंपर्क अधिकारी, कक्ष अधिकारी, माहिती अधिकारी (प्रसिध्दी), लेखाधिकारी (निधी) असे अधिकारी आहे.  मुख्यमंत्री सचिवालयात मुलाखत, फाईल, बैठक, टपाल, विशेष कार्य कक्ष, निधी आणि जनसंपर्क कक्ष असे कक्ष आहेत. 

नुतनीकरण केलेल्या कार्यालय वातानुकुलित असुन अग्नप्रितिबंधक यंत्रणेने सज्ज आहे. एकूणच मुख्यमंत्री सचिवालयाला कार्पोरेट लूक देण्यात आला आहे.  पूर्वी सहाव्या मजल्यावर असलेले मंत्रिमंडळ बैठकीचे दालन, तसेच मंत्रालयातील विविध बैठकांसाठी असलेली एकूण ५ बैठक दालने सातव्या मजल्यावर असतील.  मुख्यमंत्री सचिवालयाच्या जागेत अभ्यागतांसाठी स्वतंत्र वेगळे प्रतिक्षाकक्ष ठेवण्यात आले आहे.

----०---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा