मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री डाव्होसकडे
नव्या औद्योगिक धोरणातील सोयी सवलतींची माहिती
 गुंतवणूकदार, उद्योगपतींना देणार
------
देशातून निमंत्रित केलेले एकमेव मुख्यमंत्री
                            
          मुंबई, दि. 21 : राज्याचे नवे औद्योगिक धोरण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेल्या गुंतवणुकीच्या नव्या संधींची माहिती देऊन परदेशी उद्योगांना, तसेच गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज पहाटे स्वित्झर्लंड येथील डाव्होस येथे रवाना झाले. तेथील क्लॉस्टर्स या शहरात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस भारतातून निमंत्रित करण्यात आलेले पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. 
            22 ते 25 जानेवारी या दरम्यान होणा-या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून या वेळेची थीम ही  The Reshaping of the World : Consequences for Society, Politics and Business अशी आहे. बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री विविध देशातून आलेले मान्यवर उद्योगपती त्याचप्रमाणे  नेत्यांना भेटतील. यामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, संरक्षण क्षेत्रातील बलाढय सॅफ्रान, युनीलिव्हर, कारगिल या एफएमसीजी कंपन्या इत्यादींचा यात समावेश आहे.  नवी मुंबई   आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रस्तावित विमानतळाच्या आराखडयासंदर्भात हे शिष्टमंडळ झुरिक विमानतळातील सोयी सुविधांची पाहणी करतील आणि तेथील अधिका-यांशी चर्चा करतील. 
            डाव्होस येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे, राज्यातील विविध महत्वाच्या  क्षेत्रांत असलेल्या गुंतवणुकीच्या संधींची तसेच उद्योगांना सवलतींची माहिती द्यावी.  जेणेकरुन गुंतवणुकीचा ओघ राज्याकडे अधिक वाढेल. नव्या औद्योगिक धोरणाची कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल,  हे सांगताना गुंतवणुकदारांच्या प्रश्नांचेही  समाधान करण्यात येईल.  देशामध्ये यापूर्वीच महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात आपल्या प्रगतीचा ठसा उमटविला असून देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे. गेली 50 वर्ष महाराष्ट्राने उद्योगामध्ये देशाचे नेतृत्व केले असून आजही परदेशी नेतेमंडळी भारतात येतात,  त्यावेळी आवर्जून मुंबई तसेच महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवतात. 2011 या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक मुंबईत देखील झाली होती.  
              मुख्यमंत्र्यांनी डाव्होसच्या या दौ-यावर छोटेखानी शिष्टमंडळ नेले आहे.  यामध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, याचप्रमाणे  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांचा समावेश आहे. 

            काल दिवसभराच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आज पहाटे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन डाव्होसकडे रवाना झाले.  काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुमारे तीन तास सुरु होती.  त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती ठरविण्यासंदर्भातील तसेच उमेदवार निवडीबाबतच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री टिळक भवन येथे रवाना झाले.  या ठिकाणी सुमारे चार तास त्यांनी पक्ष पदाधिका-यांशी चर्चा केली. तसेच पत्रकारांशी संवाद साधला. सायंकाळी उशिराने वर्षा या आपल्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पूर्वनियोजित गाठीभेटी घेतल्या. तसेच अगदी विमानतळावर रवाना होण्यापूर्वीपर्यंत फाईलींचा निपटारा केला. 
        मुख्यमंत्री 25 तारखेस सायंकाळी परतत असून 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मरिन ड्राईव्ह येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा