वसई विरार, नंदूरबार, देगलूर, भुसावळ शहरातील 
पाणी पुरवठा, रस्ते कामांना गती येणार
पायाभूत सुविधांसाठी 403 कोटींना मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई,
दि. 10 : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत वसई-विरार,
नंदूरबार, भुसावळ आणि देगलूर या शहरांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 403
कोटी 61 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे या शहरांतील पाणी आणि
रस्त्याच्या समस्या दूर होणार आहेत.
वसई
विरार महानगरपालिकेतील पाणीपुरवठा योजनेसाठी 269 कोटी 79 लाख रूपये मंजूर करण्यात
आले आहेत. यामध्ये सुर्या नदी, मासवण नदी येथे दुरूस्ती करणे शक्य होणार असून
शहराला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल. याठिकाणी वॉटर पंप, त्याचप्रमाणे ऑटोमेशन
सिस्टीम आणि पाईपलाईन, तसेच पंप हाऊसची कामे हाती घेण्यात येतील. राज्य शासनाने
प्रकल्पाच्या किंमतीच्या 50 टक्के म्हणजे 134.89 कोटी रूपये एवढ्या हिश्श्यास
मान्यता दिली असून वसई विरार महानगरपालिकेचा हिस्सा तेवढाच राहणार आहे.
नंदूरबार
नगरपालिका हद्दीतील रस्ते विकासासाठी 100 कोटी 82 लाख रूपयांच्या निधीला मान्यता
दिली असून यामध्ये राज्य शासनाचा 80 टक्के आणि नगरपालिकेचा 20 टक्के हिस्सा आहे.
त्यामुळे राज्य शासनाने 80 कोटी 66 लाख रूपये मंजूर केले असून नंदूरबार नगर
पालिकेचा हिस्सा 20 कोटी 16 लाख असा असणार आहे. यामुळे नंदूरबार शहरातील
रस्त्यांची दुरूस्ती, नवीन रस्ते, दुभाजक, पदपाथ, पुल त्याचप्रमाणे पथदिव्यांची
कामे मार्गी लागतील.
देगलूर
नगर परिषदेसाठी 21 कोटी 1 लाख रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली
असून प्रकल्प किंमतीच्या 80 टक्के म्हणजे 16 कोटी 81 लाख रूपयांचा हिस्सा राज्य
शासन उचलेल. यात चार कोटी 20 लाख रूपये हिस्सा देगलूर नगर पालिकेचा असेल. या
मान्यतेमुळे देगलूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
भुसावळ
नगरपालिका हद्दीतील रस्ते विकासाच्या कामासाठी 11 कोटी 99 लाख रूपयांस मंजूरी
मिळाली आहे. त्यामुळे या शहरातील पायाभूत सुविधा बांधणे शक्य होईल. यासाठी शासनाने
प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के म्हणजे 5 कोटी 99 लाख रूपये एवढ्या हिश्यास मान्यता
दिली असून तेवढाच हिस्सा भुसावळ नगरपालिकेचा असणार आहे. या योजनेत भिलवाडे नगर
रोड, मामाजी टॉकीज रोड, प्राची रोड, सिंधी कॉलनी रोड यांचे रूंदीकरण आणि बांधकाम
होईल. 
राज्यातील
शहरांमधील दीर्घकालीन गरजांचा विचार करून त्यांचा सुनियोजित विकास करण्याच्या दृष्टीने
या नगरोत्थान महाअभियानाचा उपयोग होत असून त्यामुळे शहरांचे सौदर्य वाढण्यास आणि
सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होत आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा