सोमवार, २७ जानेवारी, २०१४

गरीब कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून
त्यांच्यातील कौशल्ये विकसित करण्याची गरज -मुख्यमंत्री
            मुंबई दि 27:  दारिद्रय रेषेखालील कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यातील कौशल्ये विकसित केल्यास या कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे शक्य होईल. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे काम एकात्मिक पद्धतीने करण्यात येत असल्याने या अभियानाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे  प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
            महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती नवोपक्रम मंच-2013-14चे उदघाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, ग्रामविकासराज्यमंत्री सतेज पाटील, विभागाचे प्रधान सचिव ए़स.एस. संधू, जागतिक बँकेचे प्रतिनिधी परमेश शहा, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव  टी. विजयकुमार, मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            राज्याचा नवीन मानव विकास निर्देशांक नुकताच अभ्यासण्यात आला. त्यामध्ये राज्याच्या काही तालुक्याचे दरडोई उत्पन्न खुपच कमी असल्याचे दिसून आल्याची माहिती देऊन  मुख्यमंत्री म्हणाले की, या अतिमागास भागावर लक्ष केंद्रीत करून एकात्मिक प्रयत्नातून इथले दारिद्रय दूर करण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. उत्तम तंत्रज्ञान, उत्तम व्यवस्थापकीय कौशल्ये, चांगले नेतृत्व आपल्याकडे आहे,  याला शिक्षण- प्रशिक्षण, कौशल्यवृद्धी, आर्थिक मदत यासारख्या पर्यायी साधनांची जोड दिल्यास  या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मागासलेपणावर मात करता येऊ शकेल.      
        राज्यात 45 लाख कुटुंब दारिद्रय रेषेखाली आहेत. या अभियानांतर्गत आपण 10 जिल्ह्यातील 36 तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या कामात शासकीय यंत्रणेबरोबर स्वंयसेवी -सेवाभावी संस्था, व्यक्ती, विद्यापीठे,  न्यास यांची मदतही मोलाची ठरणार आहे. सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉनसिबिलिटी अंतर्गत दारिद्रयनिर्मूलनाचे काही प्रकल्प हाती घेता येतील असे सांगून ते पुढे म्हणाले की,दारिद्रय निर्मुलन हा विषय जागतिक बँकेच्याही प्राधान्यक्रमावर असल्याने या कामासाठी जागतिक बँकेकडूनही अधिकाधिक सहकार्य मिळू शकेल.
विकासातून समृद्ध जीवनाची पायाभरणी होते असे सांगून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राज्याच्या मानव विकास अहवालाने गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दऱ्या स्पष्ट केल्या असून या दऱ्या सांधणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून हे आव्हान पेलण्याला ग्रामविकास विभागाने प्राधान्य दिले असून दारिद्रयनिर्मूलनाच्या कामी नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. यातील काही नवीन प्रयोगांना यश मिळत असून असे उपक्रम राबविणाऱ्या अंतिम 38 संस्थांची निवड  महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती नवोपक्रम मंच अंतर्गत करण्यात आली आहे. येत्या तीन ते चार वर्षात महाराष्ट्राने या कामी देशपातळीवर आघाडी घेतलेली दिसेल असा विश्वासही श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रम प्रसंगी अभियानाच्या लोगोचे (उमेद) तसेच उमेद या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधीची अधिक माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली तर विभागाचे प्रधानसचिव श्री. संधू यांनी प्रास्ताविक केले.

0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा