सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे विदर्भ व मराठवाड्यात
दूध उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक दुग्ध शाळा
--------
                     राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी दोन सामंजस्य करार              
            नागपूर दि. 16 : विदर्भ व मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढीकरिता, तसेच ठाणे जिल्ह्यातील गोवे भिवंडी येथे अत्याधुनिक दुग्ध शाळा उभारण्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्याशी दोन सामंजस्य करार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व एनडीडीबीच्या अध्यक्ष डॉ. अमृता पटेल यांच्या उपस्थितीत आज विधानभवन येथे करण्यात आले. या विभागांमध्ये दूध उत्पादन वाढावे व उत्पादित दूध संकलित करण्यासाठी न्यू जनरेशन कोऑपरेटिव्हचा अवलंब करण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने देशात दुग्ध विकासाबाबत मोठे काम केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादनात विदर्भ व मराठवाडा मागे आहे. त्यामुळे या भागात दूध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने एक आव्हान समजून काम करावे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.  
            यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण, रोहयो मंत्री नितीन राऊत,  दुग्धविकास राज्यमंत्री संजय सावकारे आदि मान्यवर उपस्थित होते.
             मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भ व मराठवाड्यात दूध उत्पादनाच्या व्यवसायात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी विदर्भ विकास पॅकेज, मराठवाडा विकास पॅकेज, पंतप्रधान पॅकेज त्याचप्रमाणे मुख्यमंत्री विशेष पॅकेज याद्वारे मदत करण्यात आली आहे. तरीही या विभागात दूध संकलन संघटीत पद्धतीने करण्यास सहकारी दूध संकलनाचे जाळे अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. दूध उत्पादनातही हे विभाग मागे राहिले आहेत. त्यामुळे या मागासलेल्या विभागात दूध उत्पादन व व्यवसाय चांगल्या तऱ्हेने विकसित होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्याने नेहमीच अडचणीच्या काळात साथ दिली आहे. एखादे वेळेस शेतीच्या उत्पादनात काही कारणामुळे घट झाली तर दुधासारखा पर्यायी जोडधंदा त्यांना हात देतो. आजच्या या सामंजस्य करारामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोरही असाच समर्थ पर्याय निर्माण होणार आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस संचलित मदर डेअरी फ्रुट आणि व्हेजीटेबल लि. यामार्फत दुग्ध विकासाचे कार्य विदर्भ व मराठवाडा विभागात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गाव पातळीवर दूध संकलन व्यवस्था निर्माण करणे, दूध उत्पादन वाढीसाठी अनुवंशिकता सुधारणा, फिरते कृत्रिम रेतनाचे कार्य करण्यात येणार आहे. हे काम न्यू जनरेशन को.ऑप.च्या धर्तीवर करण्यात येईल. या स्थापन केलेल्या न्यू जनरेशन कंपनीचे संचलन दुध उत्पादक  शेतकऱ्यांमार्फत करण्यात येईल. तसेच संकलित दूध मदर डेअरी फ्रुट अँन्ड व्हेजिटेबल यांच्यामार्फत दुधाची प्रक्रिया व विक्री यासाठी बाजारपेठ निर्माण करण्याचे व्यवस्थापन करेल यासाठी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक एन.डी.डी.बी.मार्फत करण्यात येईल. शासकीय दूध योजना नागपूर येथील दुग्ध शाळेची 9.88 एकर जमीन व प्रकल्प 30 वर्ष भाडेपट्टीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
          ठाणे जिल्ह्यातील गोवे भिवंडी येथील 19.49 एकर जमीन 30 वर्षाच्या भाडेपट्टीवर देण्याचा एन.डी.डी.बी.शी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार गोवे भिवंडी येथील 5 लक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची दुध शाळा उभारण्याकरिता 150 कोटी रुपयांची गुंतवणूक एन.डी.डी.बी.मार्फत करण्यात येईल.
          यावेळी एनडीडीबीच्या अध्यक्ष डॉ. अमृता पटेल म्हणाल्या की, या करारामुळे दूध उत्पादनात विदर्भ आणि मराठवाडा नक्कीच प्रगती करेल.
          दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये  दुग्ध व्यवसायाचा ज्या प्रमाणात विकास झाला आहे त्याप्रमाणात विदर्भ व मराठवाडा विभागात विकास व्हावा यादृष्टीने एनडीडीबीच्या कोणत्या उपाययोजना राबविता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एनडीडीबीचे सहकार्य घेण्यासाठी महाराष्ट्र शासन व एन.डी.डी.बी. यांच्यात दोन सामंजस्य करार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानुसार आज हे सामंजस्य करार प्रत्यक्षात आले असून यामुळे या दोन विभागात दूध उत्पादन वाढीस भरीव मदत होईल असा मला विश्वास आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध उत्पादन वाढीसाठी तत्कालिन दुग्ध विकास मंत्री नितीन राऊत यांचा मोलाचा वाटा आहे, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी नमुद केले.  
           यावेळी एनडीडीबीचे दुग्ध सेवा व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक टिक्कू, मदर डेअरी आणि व्हेजीटेबलचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप रथ, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव ए.के.जैन, सचिव अनिल डिग्गीकर, दुग्ध विकास आयुक्त यशवंत केरुरे, पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले, एनडीडीबीचे वरिष्ठ व्यवस्थापक हातेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा