सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

राजकारण आणि समाजकारण यांचा अनोखा मेळ साधणारे
श्री. मोहन धारिया हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर :  राजकारण आणि समाजकारण यांचा अनोखा मेळ साधणारे श्री. मोहन धारिया हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व होते. समाजाच्या विविध क्षेत्रात वावरताना त्यांनी मिळविलेले अजातशत्रुत्व हेच त्यांच्या कार्याचे खरे मूल्यमापन होय. वनराई च्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळातील एक महत्वाचा दुवा श्री. धारिया यांच्या निधनाने निखळला आहे. विद्यार्थीदशेत वयाच्या अठराव्या वर्षी मुरुडच्या नबाबाविरुध्द आंदोलन छेडणाऱ्या धारिया यांची आंदोलन आणि चळवळीशी असलेली नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. विशेष म्हणजे जुन्या काळातील असूनही त्यांनी आधुनिक काळाबरोबर चालून नव्या पिढीशीही उत्तम प्रकारचे नाते निर्माण केले. त्यांच्या कार्यकर्ता परिवारातील युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ हे याचीच साक्ष देते.
पाण्याचे संकट त्यांनी आधीच ओळखले आणि त्यातून वनराई चळवळ जन्माला आली. केवळ सरकारवर अवलंबून न राहता विकासकामांमध्ये समाजाचा सहभागही महत्वाचा असतो, हे त्यांनी कृतीमधून दाखवून दिले. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंत झेप घेतली तरी ते राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात जास्त रमले. या दोन्हींचा त्यांनी साधलेला समतोल हे त्यांचे वैशिष्टय होते.
तरूण तुर्क अशी स्वत:ची ओळख त्यांनी काँग्रेस पक्षात तयार केली होती.
श्री. धारिया यांच्यासारखे मनमिळाऊ, अजातशत्रू नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा