मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

मंत्रिमंडळ निर्णय
दुष्काळी भागातील जनावरांच्या छावण्यांना
३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
टँकर्स देखील गरजेप्रमाणे सुरु ठेवणार
राज्यात बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस होत असला तरी काही भागांमध्ये अद्यापही कमी वृष्टीमुळे चाऱ्याची समस्या कायम आहे.  अशा दुष्काळग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या छावण्या 31 ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  तसेच ज्या योजनांमधून तलावांमध्ये पिण्यासाठी पाणी सोडले जाते अशा योजना वीज बिले न भरल्यामुळे बंद असतील तर त्या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे  टँकर्स स्थानिक परिस्थिती पाहून सुरु ठेवण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर यापूर्वीच देण्यात आले आहेत.
राज्यात उस्मानाबादचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 313 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक तर 36 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के, 6 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला.  एकंदर राज्यात 1043.60 मि. मी. म्हणजेच सरासरीच्या 143.4 टक्के पाऊस झाला आहे.
धरणातील पाणी साठा 73 टक्के
राज्यातील विविध जलाशयात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून सध्या 73 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 47 टक्के पाणी साठा होता. आजची  स्थिती पुढीलप्रमाणे:- कोकण 86 टक्के (गतवर्षी 75 टक्के), मराठवाडा 37 टक्के (गतवर्षी 8 टक्के), नागपूर 87 टक्के (गतवर्षी 52 टक्के), अमरावती 80 टक्के (गतवर्षी 49 टक्के), नाशिक 52 टक्के (गतवर्षी 32 टक्के), पुणे 84 टक्के (गतवर्षी 54 टक्के) इतर धरणांमध्ये 91 टक्के (गतवर्षी 71 टक्के). मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून जायकवाडीमध्ये 16 टक्के साठा झाला आहे.
पेरणीची कामे वेगात
राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून, 137.17 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  कोकण, कोल्हापूर व पुणे विभागात भात पुर्नलागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.  खरीपासाठी बियाणांची गरज निश्चित करण्यात आली असून 95 टक्के बियाणे पुरवठा झाला आहे.  खतांच्या बाबतीतही 107 टक्के पुरवठा करण्यात आला आहे.
टँकर्सच्या संख्येत घट
एकंदर 822 गावे आणि 4496 वाड्यांना 1078 टँकर्स पाणी पुरवठा करीत आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास 1832 टँकर्स होते.
केवळ चार जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या
सध्या राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा 4 जिल्ह्यांमध्ये मिळून जनावरांच्या 243 छावण्या आहेत.  त्यामध्ये 1 लाख 74 हजार 380 मोठी आणि 21 हजार 924 लहान अशी 1 लाख 96 हजार 304 जनावरे आहेत. टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण 11 हजार 245 कामे सुरु असून या कामावर 87 हजार मजूर काम करीत आहेत.
----0----
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात 324 मृत्युमुखी
वारसांना मदतीचे वाटप सुरु
नागपूर  आणि अमरावती विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे 3 लाख 91 हजार 69 हेक्टर शेतीपिकांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून 9 हजार 345 हेक्टर जमीन खरडून तर 753 हेक्टर जमीन वाहून गेली आहे.  कोकण, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद विभागातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरु आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या धान पिकांसाठी 7 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तर इतर पिकांसाठी 5 हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात येत आहे.  खरडून गेलेल्या जमिनीसाठी 20 हजार रुपये तर वाहून गेलेल्या जमिनीसाठी 25 हजार रुपये रोख देण्यात येत आहेत.   
324 मृत्युमुखी
            अतिवृष्टीच्या काळात त्याचप्रमाणे वीज पडून आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील मृतांची संख्या 324 एवढी झाली आहे.  तर 1 हजार 852 जनावरे मरण पावली आहेत.  आतापर्यंत 196 मृत व्यक्तींच्या वारसांना तर 699 जनावरांच्या मालकांना मदत करण्यात आली आहे.  मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 2 लाख 50 हजार रुपये तर मृत जनावरांच्या मालकांना मोठ्या जनावरांसाठी 25 हजार तर लहान जनावरांसाठी 5 हजार रुपये देण्यात येत आहेत. वादळी वारे आणि पावसामुळे 5 हजार 334 घरांची पूर्ण पडझड तर 72 हजार 718 घरांची अंशत: पडझड झाली आहे.  त्यापैकी 4 हजार 336 घरांच्या मालकांना मदत करण्यात आली आहे. 
-----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा