बुधवार, २९ मे, २०१३

आपत्कालिन परिस्थितीशी सामना करण्यास
शासन यंत्रणा सुसज्ज - मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 29 : भारतीय हवामान विभागाने 15 जून रोजी पावसाचे आगमन होत असल्याचा अंदाज वर्तविला असून राज्य शासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व पातळ्यांवर सुसज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.
          मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे पर्जन्य 2013 च्या पूर्व तयारीबाबत राज्य व जिल्हा स्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री पतंगराव कदम, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मदत व पुनर्वसन सचिव मिलींद म्हैसकर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, महानगरपालिका आयुक्त सिताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, अग्निशमन यंत्रणेचे संचालक मिलिंद देशमुख, नौदल, हवाई दल, भारतीय हवामान विभाग आदींचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले, या वर्षी वीज कोसळल्यामुळे होणारे मृत्यु आपल्याला टाळायचे असून विदर्भ व मराठवाडा या भागात अशा घटनांचे प्रमाण जास्त असल्याने वीज पडण्याची संभाव्य ठिकाणे अधोरेखीत करण्यात यावीत व त्याबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावी. जेणेकरुन अतिवृष्टी झाल्यास अशा संभाव्य ठिकाणी लोक थांबणार नाही. सुपर कॉम्प्युटरद्वारे अचूक हवामान अंदाज वर्तविण्यासाठी राज्यामध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात लेप्टो रोगाचा प्रादुर्भाव झाला ही बाब लक्षात घेऊन राज्यात या वर्षी पावसाळ्यात लेप्टो, टायफॉईड, डेंग्यु, मलेरिया या सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
          राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाने आपत्कालिन परिस्थितीत अत्यंत समाधानकारक काम केले असून तळेगाव येथे या दलाची तुकडी कार्यरत आहे. आपतजनक परिस्थिती उद्‌भवल्यास तळेगाव येथून तेथे पोहोचणे जिकरीचे होईल, या दृष्टीकोनातून मुंबईत या दलास जागा उपलब्ध करुन देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ठाणे शहरात 61 धोकादायक इमारतीतील नागरिकांना येत्या 15 दिवसात एमएमआरडीएतर्फे देण्यात येणाऱ्या पर्यायी घरात स्थलांतरीत करण्यात यावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांना रेल्वे गाड्यांमध्ये याबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी रेल्वेने यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचीत केले.                                            
          महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यावेळी झालेल्या सादरीकरणादरम्यान म्हणाले, मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत असून हॉटलाईनद्वारे संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात येत आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अतिशय प्रभाविपणे कार्यान्वित झाला असून येत्या पावसाळ्यात पूर परिस्थितीवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. मिठी नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम पूर्ण झाले असून 30 मे पासून खोदाई कामास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी खड्ड्यांची माहिती दिल्यास तात्काळ ते खड्डे बुजविण्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच 18,750 झाडे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कापण्यात आली असून मलेरिया प्रतिबंधासाठी 5 सुत्री कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यु दरात लक्षणीय घट झाली आहे व या वर्षी मलेरियामुळे एकही मृत्यू होऊ नये असे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. डासांची उत्पत्तीच होऊ नये यासाठी प्रत्येक वार्डाच्या कानाकोपऱ्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. पावसाळ्यात वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पूर्ण तयारी केली आहे. अतिवृष्टीमुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 180 पंप बसविण्यात आले आहेत, तसेच महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या मानांकित कार्यप्रणालीची (SOP) माहितीही त्यांनी दिली.
          कोकण,  नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे, मराठवाडा विभागीय आयुक्तांनी यावेळी संबंधित जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची संख्या, आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा, पर्जन्यमापन उपकरणे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उपलब्ध आरोग्य व्यवस्था, आपत्कालीन बचाव पथकांना दिलेले प्रशिक्षण, पुरविण्यात आलेले लाईफ जॅकेट, बोटी, जनरेटर, टॉर्च आदी साहित्य तसेच जनजागृती कार्यक्रम या बाबींची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.
          उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजित कुंभ मेळ्याच्या दृष्टीकोनातून पाणी व आरोग्य  याबाबतीत चोख व्यवस्था ठेवण्याचे आदेश यावेळी दिले. वनमंत्री पतंगराव कदम यांनी येत्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिकेतर्फे अतिशय सुसज्ज यंत्रणा तत्पर ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा