एमएमआरडीएच्या 4028 कोटीच्या
अर्थसंकल्पास मंजुरी
मुंबई महानगर
प्रदेशात वाहतुकीच्या पुरेशा 
सुविधांसाठी पुरेशी आर्थिक
तरतूद : मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 23: मुंबई महानगर प्रदेशाचा विकास झपाट्याने होत
असून पुरेशा पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्याला आमचे प्राधान्य आहे.  यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाच्या 2013-14 च्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
        प्राधिकरणाच्या
आजच्या 132 व्या बैठकीत
4028 कोटी 57 लाख
रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. बैठकीला आमदार नबाब
मलिक, आमदार प्रकाश बिनसाळे, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य सचिव
जयंतकुमार बांठिया, मुंबईचे महापौर सुनिल प्रभु, मुंबई
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्यासह
प्राधिकरणाचे सदस्य, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
        याविषयी अधिक माहिती
देतांना मुख्यमंत्री म्हणाले, आज शहरामध्ये असलेल्या पायाभूत सुविधांना पूरक
ठरण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशचा सुनियोजित विकास आवश्यक ठरतो. अर्थसंकल्पामध्ये
विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असून
त्यासाठी रु. 622 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  यामध्ये सहा उड्डाणपूल, नायगाव आणि
भाईंदर दरम्यान वसई खाडी
पूल आणि 90 हून अधिक कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे
जाळे विकसीत करण्यात येणार आहे.  यामुळे वसई, ठाणे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कर्जत, बदलापूर, अर्नाळा अशा
विविध ठिकाणी विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत.  त्याचप्रमाणे शिरगाव-पडघा-टिटवाळा-बदलापूर
रस्ता (37 कि.मी.),
कल्याण रिंग रोड (27.70 कि.मी.),
भिवंडी रिंग रोड (12 कि.मी.), नेरळ-दस्तुरी नाका-माथेरान
रस्ता (8 कि.मी.),
रेवस-कारंजा पूल (1.80 कि.मी.) आणि एनएच-4 वरील टक्का
कॉलनीपासून पळस्पे फाट्यापर्यंत (1.73 कि.मी.) लांबीच्या
रस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये रु. 20 कोटींची
तरतूद करण्यात आली आहे.  उड्डाणपूल, रस्ते आणि
खाडी पूल यांच्या विकासामुळे दळणवळण सोपे होऊन महानगराचा आर्थिक विकास होणेदेखील
शक्य होणार आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. 
        मेट्रो रेल
प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये रु. 608 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  यापेकी रु. 500 कोटी कुलाबा-वांद्रे-सीप्झ
मेट्रो मार्गासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.  त्याचप्रमाणे मोनोरेल प्रकल्पासाठी
अर्थसंकल्पामध्ये रु. 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर
मेट्रो मार्ग आणि चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा पहिला टप्पा हे दोन्ही
प्रकल्प यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर
मेट्रो मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली जाणार आहेत.  तर, चेंबूर ते वडाळा
दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोनोमुळे वेळ आणि इंधनावरच्या खर्चाची बचत करणे शक्य
होणार आहे, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान
म्हणाले.
        मुंबई नागरी
परिवहन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये रु. 500 कोटींची
तरतूद करण्यात आली आहे.  यापैकी
सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्ता, पादचारी पूल, हलाव पूल, सेवा रस्ते, पूलांच्या
खालील भागांचे सुशोभिकरण आणि टिळक नगरच्या रहिवाशांचे पुनर्वसन यासाठी रु. 200 कोटींची
तरतूद करण्यात आली आहे.  
        यावर्षाखेरीज
सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच रेल्वे
विभागाकडून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्यामुळे जोड रस्त्याचे काम युद्ध
पातळीवर सुरू आहे, असे प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर
आयुक्त आणि
एमयुटीपी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, एस.व्ही.आर. श्रीनिवास
यांनी सांगितले.
        उर्वरित रु. 300 कोटींची
तरतूद मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या रेल्वे घटकांसाठी
करण्यात आली आहे.  यामध्ये
सीएसटी ते कुर्ला दरम्यानचा 5वा आणि 6वा अतिरिक्त मार्ग, ठाणे आणि दिवा
दरम्यानचा अतिरिक्त मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यानचा 6वा मार्ग
आणि उपनगरीय रेल्वेसाठी नव्या डब्ब्यांची खरेदी या प्रकल्पांचा समावेश आहे.
        अर्थसंकल्पामध्ये
मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी रु. 150 कोटी तर, शिवडी-वरळी उन्नत
मार्गासाठी रु. 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  शिवडी-वरळी उन्नत मार्गामुळे पारबंदर
मार्गावरुन होणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  या दोन्ही प्रकल्पाची निविदा प्रक्रिया
पूर्ण होऊन प्रकल्पांचे बांधकाम यंदाच्या वर्षी सुरु होणे अपेक्षित आहे.  रु. 517 कोटींच्या
शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी प्राधिकरणाची मंजूरी आणि अर्थसंकल्पामध्ये
रु.
50 कोटींची
तरतूद एकाचवेळी मागितली होती, तशी तरतूद मिळाली.  असल्यामुळे वेळेची बचत झाली आणि प्रकल्पांच्या
प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला गती मिळाली आहे, असे प्रधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त
श्रीमती आश्विनी भिडे म्हणाल्या.
        कलानगर
जंक्शन येथील भुयारी मार्ग (रु. 75 कोटी), वांद्रे-कुर्ला
संकुलपासून पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग (रु. 50 कोटी) आणि खेरवाडी
येथील उड्डाणपूल (रु. 22 कोटी) या
प्रकल्पांसाठीही अर्थसंकल्पामध्ये एकूण रु. 147 कोटींची
तरतूद करण्यात आली आहे.  वांदे-कुर्ला
संकुल, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने
प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी या तीन्ही प्रकल्पांमुळे मोठी सोय उपलब्ध होणार
आहे.  सहाजिकच, त्यांच्या वेळेची
आणि इंधनाची बचत होणार आहे, अशी माहिती श्री. मदान यांनी
दिली.
        वडाळा ट्रक
टर्मिनस क्षेत्रासाठी प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरणाची भूमिका पार पाडत आहे.  यासाठी अर्थसंकल्पामध्ये रु. 85 कोटींची
तरतूद करण्यात आलेली आहे.  यामुळे
तेथील रस्त्यांचे जाळे, सांडपाडी प्रक्रिया केंद्र, सेवा
वाहिन्या आणि सुशोभिकरणाचे काम करणे शक्य होणार आहे.  त्याचप्रमाणे प्राधिकरणाने बांधलेल्या
आणि गर्द वस्तीमधून जाणाऱ्या उड्डाणपूलांवर ध्वनी प्रदुषण नियंत्रके लावण्यासाठी
रु.
35 कोटींची
तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
        आणिक-पांजरपोळ-घाटकोपर जोड
रस्त्यांसाठी (रु. 55 कोटी), मिलन आणि
सहार उन्नत मार्गासाठी
(रु. 35 कोटी) आणि अंधेरी-घाटकोपर जोड
रस्त्यासाठी (रु. 27 कोटी) अशी एकूण रु. 117 कोटींची
तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
        शहरामध्ये
येणे-जाणे सुकर करणारा आणखी एक प्रकल्प म्हणजे विरार (नवघर) पासून
अलिबागपर्यंत जाणारा 126 कि.मी. लांबीचा बहुउद्देशीय
मार्ग.  हा प्रकल्प
दोन टप्यांमध्ये राबविला जाणार आहे.  पहिल्या
टप्प्यात विरार (नवघर) ते चिरनेर (79 कि.मी.) मार्गाचे
काम होती घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात चिरनेर ते अलिबाग (47 कि.मी.) मार्गाचे
काम हाती घेण्यात येणार आहे.  यासाठी
आवश्यक असणारे प्राथमिक आराखडे आणि तांत्रिक-आर्थिक सुसाध्यता
अभ्यास पूर्ण झालेला असून हे दस्तावेज प्रादेशिक रस्ते वाहतूक नकाशामध्ये दाखल
करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.  रु. 9326 कोटींच्या
या बहु उद्देशीय मार्गावर मुख्य वाहतूकीसाठीच्या मार्गिकांशिवाय बसेस, दुचाकी
वाहने आणि यंत्र रहित वाहनांसाठी विशेष मार्गिका उपलब्ध असणार आहेत.  प्राधिकरणाने प्रकल्पासाठी रु. 50 कोटींची
तरतूद केलेली आहे.
        बैठकीला रायगड
जिल्हा परिषद अध्यक्षा कविता गायकवाड, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका
गायकवाड, भिवंडी निजामपूरच्या महापौर प्रतिभा पाटील, अलिबागच्या
नगराध्यक्षा नमिता नाईक, उरणचे नगराध्यक्ष गणेश शिंदे, माथेरानचे
नगराध्यक्ष अजित सावंत, महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष
राहुल शेवाळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव व  श्रीकांत सिंह, गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव देबाशीष चक्रवर्ती, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन
श्रीमाळी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, यांच्यासह प्राधिकरणाचे सदस्य,
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा