मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२



शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार
     -- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर दि. 25 : शाहू महाराजांच्या विचाराचा आणि कार्याचा प्रसार त्यांच्या स्मारकातून व्हावा, यासाठी शाहू मिलच्या जागेवर त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागा पाहणी प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची महती तसेच त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्याची जगाला माहिती व्हावी, म्हणून शाहू मिलच्या 27 एकर जागेत त्यांचे भव्य-दिव्य असे स्मारक उभारण्यात येणार आहे. शाहू महाराजांनी घातलेल्या सामाजिक सुधारणेचा पाया या स्मारकातून भावी पिढीला प्रेरणा देईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्मारक उभारणीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचा समावेश करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, या युगपुरुषाने सामाजिक समतेसाठी केलेले कार्य भावी पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरण्यासाठी शाहू मिलच्या ऐतिहासिक जागेवर त्यांचे स्मारक उभारण्याची कल्पना पुढे आली. या कल्पनेला राज्य शासनाने मूर्त रुप देऊन स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शंभर वर्षापुर्वी स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी या मिलची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे या जागेवर स्मारक उभारण्यापूर्वी सध्या असलेल्या मिलचे, जागेचे, वास्तुचे चित्रीकरण, व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ठेवण्यात येणार असून याबाबतचे एक पुस्तकही तयार करुन या वास्तुचा ऐतिहासिक वारसा जतन केला जाईल. आंतरराष्ट्रीय वास्तुविषारदांंच्या मार्गदर्शनानुसार या मिलमधील कांही वास्तू जतन करण्यासारख्या असल्यास त्याबाबतही योग्यतो निर्णय घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी स्मारक होत असल्याने या ठिकाणच्या जागेचा कोणत्याही प्रकारे व्यापारीकरणासाठी वापर होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराजांनी त्याकाळी सुरु केलेले सामाजिक आरक्षण, सक्तीचे शिक्षण, सामाजिक समता यासारख्या त्यांच्या विचारांची-कार्याची ओळख साऱ्या देशाला, जगाला व्हावी, यासाठी जागतिक दर्जाच्या समाजशास्त्रज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शाहू मिलची जागा शाहू स्मारकासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्रीमहोदय व राज्य शासनाचे आभार मानले. ते म्हणाले, राज्य शासनाने शाहू महाराजांच्या स्मारक उभारणीबाबत गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णय होऊन लवकरच समितीची बैठक घेण्यात येणार आहे. शाहू स्मारक उभारण्याबाबत लवकरच शाहूप्रेमींचा मेळावा घेण्यात येणार असून स्मारकासाठी शाहूप्रेमींच्या सूचनांचा स्मारक आराखड्यात समावेश करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचीही स्मारके लवकरात लवकर व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्य शासनाने शाहू मिलची जागा ऐतिहासिक स्मारकासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्रीमहोदय व राज्य शासनाचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचीही स्मारके लवकरात लवकर व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कलाप्पाण्णा आवाडे, आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, निवासी उपजिल्हाधिकारी, संजय पवार, मान्यवर नागरिक, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा