सोमवार, ३ डिसेंबर, २०१२



इंदू मिल संदर्भात मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याशी भेट

                    
नवी दिल्ली, 3 डिसेंबर : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे त्या जागेवर स्मारक उभारताना कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही, याची काळजी केंद्र व राज्य सरकार घेत असून ही कार्यवाही शेवटच्या टप्यात आहे. अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दुपारी केंद्रीय वाणिज्य, उद्योग व वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
                 इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभे रहावे, यासाठी गेल्या वर्षी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीनंतर या ठिकाणी स्मारक उभारण्याचा तत्वत: निर्णय स्वत: पंतप्रधानांनी जाहीर केला. त्यामुळे स्मारक उभे राहणारच आहे. या सर्व प्रक्रीयेत जागा हस्तांतरणाचा कळीचा मुद्दा होता. यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीच्या कार्यवाहीला काही तांत्रिक बाजूंची पूर्तता केल्यानंतर अंतीम स्वरुप दिले जाणार आहे. राज्य शासनाने आपल्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
                  या ठिकाणचे स्मारक हे घटनाकारांच्या कार्य कर्तृत्वाला जागतिक स्तरावर उजाळा देणारे असणार आहे. त्यामुळे अशाप्रकारचे दीर्घकाल प्रेरणा देणारे स्मारक उभे राहत असताना सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

                 वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांनीही यावेळी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला ही जमीन हस्तांतरीत करताना कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करण्यात आली होती. आता पुन्हा ही जमीन स्मारकाला देण्यासाठी हस्तांतरणाची प्रक्रीय करावी लागणार आहे, त्यासाठी वेळ लागत आहे. तथापि, पंतप्रधानांची तत्वत: मान्यता, महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही सभागृहाची मागणी आणि जनतेची याबाबतची भावना बघता सर्व अडचणी लवकरच दूर केल्या जातील.
                 राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतल्यानंतर दुपारी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.यावेळी राज्याच्या विविध प्रश्नावर त्यांची चर्चा झाली.

*********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा