मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२


निसर्गाशी जवळीक साधत पर्यावरणपूरक पध्दतीने
विजयादशमी साजरी करूया
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 23 : विजयादशमी हा विजयोत्सवाचा आणि सीमोल्लंघनाचा दिवस आहे.  बदलत्या काळात आपण हा सण निसर्गाच्या जवळ जात पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा केला पाहिजे. अनिष्ट प्रथा, वाईट चालिरीती यांच्यावर विजय मिळवून आरोग्यदायी, पर्यावरणानुकुल गोष्टी स्वीकारण्याची सीमोल्लंघन केले पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी नवीन कामाची सुरुवात, अध्ययनाची सुरुवात, सरस्वती पूजन असते. महिषासुराचा वध, रामाकडून रावणाचा वध, पांडवांच्या वनवासाची समाप्ती, असे सर्व याच दिवशीचे शुभसंकेत आहेत. वनवासास जाण्यापूर्वी आपली शस्त्रे पांडवांनी शमीच्या झाडात लपवून ठेवली होती. ती शस्त्रे याच दिवशी त्यांनी शमीच्या वृक्षातून परत काढून घेतली. त्याची आठवण म्हणून संध्याकाळी सीमोल्लंघनास जाऊन देवीचे घ्यायचे आणि शमीची पाने सोने म्हणून येताना घरी आणायची, अशी प्रथा आहे. यामागे वीरांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कौतुक करणे ही भावना आहे.
या सगळयाचा विचार करता आपण सीमोल्लंघनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा.  सीमोल्लंघन म्हणजे सीमेच्या चौकटीत न अडकता तिचे उल्लंघन करून पुढे जाणे. सध्याच्या पर्यावरण रक्षणाच्या काळात निसर्गास हानीकारक अशा  सामाजिक, कौटुंबिक चौकटी मोडून निसर्गपूरक सवयींचा स्वीकार करणे असा सीमोल्लंघन आपल्या जीवनशैलीत करण्याची खरी आवश्यकता आहे, असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.
-----0-----





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा