शनिवार, १ सप्टेंबर, २०१२



अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

          मुंबई, दि. 1: नागरी जीवन अधिक संपन्न करण्याच्या दृष्टीने नगरपालिकांच्या सेवा सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था करीत असलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे काढले.
          अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट) पदवीदान समारंभ काल अंधेरी येथील मेयर्स हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झाला त्यावेळी ते बोलत होते.
          वाढत्या नागरिकरणामुळे नगरपालिका प्रशासनाला नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिक आपल्या हक्कांबाबत अधिक जागरुक होत आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरपालिकांच्या क्षमतावर्धनासाठी ही संस्था करीत असलेले मार्गदर्शनाचे आणि प्रशिक्षणाचे कार्य उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरुप अखिल भारतीय असले तरी या संस्थेने जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील पालिका सदस्य व कर्मचारी या संस्थेच्या शैक्षणिक संकुलात प्रशिक्षण अथवा विचार-विनिमयासाठी येत असतात. नगर प्रशासनासाठी उपयुक्त असे विविध अभ्यासक्रम व उपक्रम संस्थेतर्फे आयोजित केले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाशी या संस्थेने आपली बांधिलकी गेल्या 86 वर्षांपासून जपली आहे.
          मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन या नामांकित संस्थेत त्यांनी घेतलेले प्रशिक्षण नगर नियोजनाच्या कार्यात भविष्यात उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
          या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. जतीन मोदी, महासंचालक रणजित चव्हाण, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस.मदान, मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटचे संचालक    बी.सी. खटुआ आदी मान्यवर उपस्थित होते.
* * * * * * *


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा