मंगळवार, १ मे, २०१२


राज्याच्या विकासात कामगारांचा मोलाचा वाटा
                                          - मुख्यमंत्री

        मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रातील आज आघाडीचे राज्य आहे. इतर विविध क्षेत्रातही राज्याने प्रगती केली असून यात कामगारांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
        भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने कामगार क्रीडा भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावीत, आमदार माणिकराव गावीत, आमदार भाई जगताप, कामगार आयुक्त मधुकर गायकवाड, महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.
        मुख्यमंत्री म्हणाले की, कामगारांना न्याय मिळवून देण्याची शासनाची नेहमीच भूमिका राहिली आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने व्यापक प्रयत्न केले असून बांधून तयार असलेल्या सुमारे 6 हजार 800 घरांची प्रत्येकी किंमत साडेबारा लाखावरुन साडेसात लाखापर्यंत कमी करण्यात आली आहे. माथाडी कामगार आणि खासगी सुरक्षा रक्षकांनाही त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंडळांच्या माध्यमातून विविध लाभ देण्यात येत आहेत. बाल कामगारांसारख्या अनिष्ट प्रथेच्या निर्मूलनासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृती दलाची स्थापना केली आहे. असंघटीत घरेलू कामगारांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांसाठीही मंडळ स्थापन करण्यात आले असून मार्च 2012 पर्यंत या मंडळाकडे 512 कोटी रुपयांचा उपकर जमा झाला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कामगार कल्याण मंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        राज्यमंत्री श्री. गावीत म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील मालक आणि कामगार हे दोन्ही घटक महत्त्वाचे असून हे दोन्ही घटक टिकले तरच कामगारांचा विकास होईल. शासनाने कामगारांच्या हितासाठी विविध कल्याणकारी मंडळांची स्थापना केली असून त्यामार्फत कामगारांना विविध लाभ दिले जात आहेत. असंघटीत कामगारांनाही असेच लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
        याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के.शेट्ये यांना भिष्माचार्य पुरस्कार, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, कोहिनूर कॉन्टिनेन्टलचे अध्यक्ष उन्मेश जोशी व काशिद बीच रिसॉर्टचे अध्यक्ष अमिर अली कोटडीया या दोघांना औद्योगिक शांतता पुरस्कार, योगिराज स्वामी व ईश्वर हैद्राबादी यांना उत्कृष्ट संघटक पुरस्कार, विनोद चाळके यांना महाकवी कालिदास पुरस्कार,
डॉ. रुपा कुळकर्णी यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सौ. गार्गी रावते यांना रणरागिणी पुरस्कार, धनंजय देसाई व सौ. अनिता काळे यांना भारतीय कामगार कर्मचारी महासंघ भूषण पुरस्कार, करुणानिधी आर. चतुर्वेदी यांना आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा