शनिवार, ७ एप्रिल, २०१२


टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे
निधीची कमतरता भासू देणार नाही - मुख्यमंत्री

        पुणे, दि. 7 : राज्यात यावर्षी टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील नऊ जिल्हयामध्ये त्याची अधिक तीव्रता जाणवत आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि मजुरांना कामे देण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. अहमदनगर, नाशिक, धुळे, सोलापुर,सातारा, सांगली,उस्मानाबाद, पुणे, लातूर हे ते जिल्हे आहेत 
        राज्यातील टंचाई परिस्थिती शंभर कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा आढावा पुणे येथील 'यशदा' येथे घेण्यात आला, त्यावेळी आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पाणी पुरवठा स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, जलसंपदा मंत्री रामराजे नाईक- निबांळकर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विविध विभागांचे सचिव, पुणे, नाशिक औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त, अहमदनगर, धुळे, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
        नऊ जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. त्या जिल्हयातील पाणी टंचाई, धरणातील पाणी साठा, टँकर, जनावरांचा चारा, मजुरांना मजूरीचाही  विस्तृत आढावा घेण्यात आला.
गावांत टँकर  पोहचला पाहिजे
        त्यानंतर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, 1972 2003 मध्ये देखील आपण दुष्काळी परिस्थितीला सामोरे गेलो. त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे.  टँकरची  मागणी आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्या गावांत टँकर  पोहचला पाहिजे, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी  रोज बैठका घ्याव्यात, आणि बैठकीतील निर्णय लगेच प्रसिध्दी माध्यमांना द्याव्यात, म्हणजे आपण काय करतो, आणि लोकांचे प्रश्न काय आहेत हे कळेल? असे त्यांनी सांगितले.
नियंत्रण कक्षाची स्थापना
        जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करणे, व्हिडीओ कॉन्फरन्शींगद्वारे तहसिलदार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रोज संपर्क साधणे, टंचाई परिस्थितीत कोणीही रजा घेऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
वीज कनेक्शन तोडू नये
        प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अन्य पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन तोडू नये, तोडले असतील तर तातडीने जोडण्यात यावे, विहिरीतील तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम घेण्याबाबत त्यांनी सूचित केले.
        जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून टँकर खरेदी करता येईल, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती अभावी बंद असेल तर तातडीने सुरु कराव्यात, पाण्याच्या सिन्टेक्स टाक्या साखर कारखान्यांच्या भाग विकास निधीतून खरेदी करता येईल, ही सूचना  हर्षवर्धन पाटील यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांनी पाठपुरावा करावा, असे सांगितले.
        यावर्षी 35 हजार हेक्टर जमिनीवर चाऱ्याची लागवड केली आहे, त्यामुळे पुढील महिन्यात हिरव्या चाऱ्यांची उपलब्धता होईल. शंभर कोटी वृक्ष  लागवडीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी येत्या पावसाळ्यात त्याचे दृश्य परिणाम दिसतील,  त्या पध्दतीने काम करावे, असे सांगितले. 
0 0  0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा