सोमवार, ३० एप्रिल, २०१२



व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला
14 जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा
मुंबई, दि. 30 :
नमस्कार सर, मी सांगली जिल्हाधिकारी श्याम वर्धने बोलतो आहे
श्री. वर्धने, मला सांगा तुमच्या जिल्ह्यात टंचाई, चारा डेपो आणि टँकरने पाणीपुरवठ्याची ताजी स्थिती काय आहे...
या संवादानंतर श्री. वर्धने यांनी सांगली जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीची आणि जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. प्रसंग होता, मुख्यमंत्र्यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील 14 टंचाईग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा.
वर्षा निवासस्थानातील सभागृहातून श्री. चव्हाण यांनी आज सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद, लातूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, सोलापूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर विभागीय आयुक्तांशी थेट संवाद साधला आणि टंचाई परिस्थितीबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव सचिव प्रविणसिंह परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, रोहयोचे प्रधान सचिव आर. सी. सागर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह आणि डॉ. नितीन करीर उपस्थित होते.
जिल्हास्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधल्यावर मुख्यमंत्र्यांसमोर राज्यातील पाणी टंचाई, चाऱ्याची मागणी आणि यंत्रणेने या संदर्भात हाती घेतलेल्या उपाययोजनांचे चित्र स्पष्ट झाले. तसेच टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टँकरच्या फेऱ्यांचे मॉनिटरींग, एसएमएस सारख्या छोट्याशा आणि सोप्या माध्यमातून केले जात आहे, अशाही काही अनोख्या बाबी समोर आल्या.

विशेषत: सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील पाणी टंचाईची स्थिती गंभीर असल्याचे या संवादातून निष्पन्न झाले. सांगली जिल्ह्याच्या 140 गावांमधील 1331 वाड्यांमध्ये 213 टँकर्सच्या माध्यतून लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. दररोज या टँकरच्या 722 फेऱ्या होत आहे. सुमारे 4 लाख 28 हजार नागरिकांना पिण्याचे पाणी नियमितपणे पुरविण्यात येत आहे. सर्वाधिक टँकरची संख्या जत (88) आणि आटपाडी (58) या तालुक्यांमध्ये आहे. गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या एसएमएस वरून टँकरच्या किती खेपा झाल्या याची माहिती वारंवार घेतली जात आहे आणि आवश्यकतेप्रमाणे फेऱ्या वाढविल्या जात आहे.
सातारा जिल्ह्यामध्येही 145 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याच पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात 22 ठिकाणी जनावरांसाठी चारा डेपो आणि एक ठिकाणी जनावरांची छावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात 18 नळ पाणी योजनांच्या दुरूस्त्यांची कामे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली असून त्यापैकी पाच पूर्ण झाली आहे. उर्वरीत 13 योजनांच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर, संगमनेर आणि आणि अहमदनगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहे. जिल्ह्यात 214 टॅकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठेही चारा टंचाइ जाणवत नाही. 50 टँकर्सच्या माध्यमातून आणि 236 विहिरी अधिग्रहित करून लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 60 टँकर्स, लातुर जिल्ह्यात 14 टँकर्स, नाशिक जिल्ह्यात 100 टँकर्स, सोलापूर जिल्ह्यात 181 टँकर्स, नागपूर जिल्ह्यात 15 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
संपूर्ण मे महिना आणि कदाचित पाऊस लांबल्यास त्यापुढील कालावधी यासाठी पाणी पुरवठा, चाऱ्याची उपलब्धता, रोजगार हमीची पुरेशी कामे याची व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा