शनिवार, ३१ डिसेंबर, २०११


नववर्षानिमित्त जनतेला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 31 डिसेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नववर्षानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात नेहमी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राने आजच्या बदलत्या काळाला अनुसरून राबविलेल्या धोरणांमुळे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विज्ञान आणि विशेषत: माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अफाट प्रगतीमुळे येत्या काळात सर्व क्षेत्रात आणखी गतिमानता येणे क्रमप्राप्त ठरते.
औद्योगिकदृष्ट्या देशातील इतर राज्यापेक्षा आघाडीवर राहणाऱ्या महाराष्ट्राचा औद्योगिक विस्तार मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-औरंगाबाद-नागपूर या परिसरात निर्माण      झाला आहे. हा विस्तार राज्याच्या सर्व भागात व्हावा आणि त्याद्वारे रोजगार-स्वयंरोजगाराच्या विपूल संधी निर्माण होऊन ग्रामीण भागातही समृद्धीची पहाट उगवावी, हे माझे स्वप्न आहे. राज्याचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. पुढील काही वर्षात नगरांच्या या बदललेल्या स्वरुपामुळे नव्या महाराष्ट्राचा उदय होईल. राज्याच्या समृद्धीला शेतीचा आधार मिळून कृषी क्षेत्राचे रूप बदलण्याचाही प्रयत्न केला जाईल. प्रशासन पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देणारे राहिल, याकडेही राज्य शासनाचे लक्ष आहे. मागासभागातला अनुशेष दूर करून पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविणे आणि त्याच बरोबर आरोग्य, शिक्षण आणि सिंचनाच्या सोयी अधिक वाढविणे ही माझ्या शासनाची प्राथमिकता राहणार आहे. राज्याला ग्लोबल स्टेटचा दर्जा देण्याचा आमचा प्रयत्न असून या सर्व वाटचालीत राज्यातील जनतेने योगदान द्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणतात की, सरत्या वर्षाला निरोप देत असताना नवी स्वप्ने, नव्या आशा, नवी उमेद आणि नाविन्याची कास धरत आपण सर्वांनीच नव्या वर्षाचे स्वागत करूया.
---00---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा