रविवार, ३० जून, २०१३

 शहिद विंग कमांडर कॅस्टेलिनो यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
        मुंबई, दि.30 : उत्तराखंडमधील ऑपरेशन राहत’ मध्ये आपदग्रस्तांची सुटका करताना भारतीय हवाई दलातील विंग कमांडर डॅरेल कॅस्टेलिनो यांनी देशसेवा करताना केलेले प्राणार्पण हा सर्वोच्च त्याग आहे. शहिद विंग कमांडर डॅरेल कॅस्टेलिनो यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्यासाठी त्यांच्या आप्तस्वकियांना सामर्थ्य मिळो, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
विंग कमांडर डॅरेल कॅस्टेलिनो यांच्यावर आज शासकीय इतमामात मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  स्व. कॅस्टेलिनो यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नसीम खान, मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.
0000

शुक्रवार, २८ जून, २०१३

मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई, दि.27 : मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांची अनेकवेळा भेट घेऊन पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प मुंबईच्या परिवहन व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे.
        कुलाबा - वांद्रेविमानतळसीप्झ असा हा 32 किलोमीटरचा मार्ग असून त्यावर 27 स्थानके असणार आहेत. हा संपूर्ण मार्ग भूमिगत (अंडरग्राऊंड) असून त्यावरुन रोज 22 लाख प्रवासी प्रवास करतील. या प्रकल्पाचा खर्च 24 हजार 340 कोटी रुपये आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येकी 50 टक्के निधीची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात चालु आर्थिक वर्षात होणार असून सहा वर्षात तो पूर्ण होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने हा प्रकल्प राबविला जाईल. दक्षिण मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स ही दोन व्यापारीदृष्ट्या महत्वाची ठिकाणे, तसेच विमानतळ यासाठी हा प्रकल्प खुप महत्वाचा ठरणार आहे.

000000

बुधवार, २६ जून, २०१३

मंगळवार, २५ जून, २०१३

औषध विक्रेत्यांचे नियमानुसार काम आंदोलन मागे
औषध विक्रेत्यांच्या समस्यांबाबत संघटना आणि
शासनाची संयुक्त समिती नेमणार - मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 25 : औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी आणि शासनाचे प्रतिनिधी यांची समिती आठवड्याभरात नेमण्यात येईल आणि औषध विक्रेत्यांच्या अडीअडचणींवर कायद्याच्या मर्यादेत राहून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँएड ड्रगिस्ट असोसिएशनने आपले उद्यापासून सुरु होणारे नियमानुसार काम आंदोलन मागे घेतले.

          असोसिएशनने उद्यापासून औषध विक्रीची दुकाने दुपारी 2 ते रात्रौ 10 या वेळेत व एकाच पाळीत चालविण्याचे आंदोलन जाहीर केले होते. या संदर्भात मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार डॉ. कल्याण काळे, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे, असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव अनिल नावंदर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले की, औषध विक्री संदर्भात असलेले कायदे पाळावेच लागतील. कायदे मोडणाऱ्यांवर संबंधित यंत्रणेमार्फत कारवाई होईलच. मात्र औषध विक्रेत्यांच्या काही अडचणी किंवा प्रशासनासंदर्भात गाऱ्हाणी असतील तर त्यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणे शक्य आहे. मात्र नागरिकांना वेठीला धरुन टोकाची भूमिका विक्रेत्यांनी घेऊ नये. औषधे ही जिवनावश्यक बाब असल्यामुळे रुग्णांना 24 तास औषध उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाने ज्या औषध विक्रेत्यांवर कारवाई केली, ती चुकीची आहे असे आढळल्यास समितीच्या माध्यमातून त्यावर फेरविचार करणे शक्य आहे. तसेच सध्याच्या कायद्यात काही बदल आवश्यक असल्यास योग्य माध्यमातून ते बदलण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत. त्यासाठी कायदा हाती घेणे किंवा जनतेला वेठीस धरणे योग्य होणार नाही.
          औषध विक्रेत्यांची सेवा ही सामाजिक हिताची आहे, याची शासनाला जाणिव आहे असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, औषध विक्रेते आणि शासन यांच्यात संवादाचा अभाव आहे. तो संपविण्यासाठीच या समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीची रचना, कार्यपद्धती याबाबत खात्याचे मंत्री व राज्यमंत्री यांनी निर्णय घ्यावा, असे श्री. चव्हाण म्हणाले.
0 0 0 0 0







इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया
विनाव्यत्यय, तातडीने पूर्ण करु-         केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री के. एस. राव
मुंबई, दि. २५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी येथील इंदू मिलच्या जमिनीच्या प्रत्यक्ष हस्तांतरणाची प्रक्रिया विनाव्यत्यय आणि तातडीने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही नवनियुक्त केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री के. एस. राव यांनी दिली.   
श्री. राव यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधानभवनातील त्यांच्या दालनात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बॉंठीया, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव जोहरा चटर्जी, संयुक्त सचिव सुनैना तोमर, मुंबई महापालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अजितकुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील नागरीकांचे प्रेरणास्थान आहे. मुंबईत इंदू मिलच्या जागी त्यांचे भव्य स्मारक उभारणे नियोजित आहे. एनटीसीकडून राज्य शासनाकडे जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन स्मारक उभारणीच्या कामाला गती दिली जाईल, असे ते म्हणाले.
वस्त्रोद्योगासमोरील अडचणी दूर करु – राव
महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाला पोषक असे वातावरण आहे. राज्यातील वस्त्रोद्योगासमोरील सर्व अडचणी दूर केल्या जातील, अशी ग्वाही श्री. राव यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाच्या हिताच्या दृष्टीने केद्र शासनाच्या टफ योजनेतही अनुकुल सुधारणा केल्या जातील, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे नवीन वस्त्रोद्योग धोरण अत्यंत आदर्श असून  त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्याच्या काही ठराविक भागातच एकत्रित झालेल्या उद्योगांना विदर्भ, मराठवाडा अशा अविकसीत भागात आकर्षित करण्याच्या दृष्टीने राज्याने अत्यंत महत्वाकांक्षी असे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. विकासाचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी या धोरणाचा उपयोग होऊ शकेल. कापूस उत्पादीत होणाऱ्या विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाला या धोरणामुळे चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
०००००००
 



सोमवार, २४ जून, २०१३

उत्तराखंडातील भाविक सुखरुप मदत व बचाव कार्याला वेग
 - मुख्यमंत्री
नवी दिल्ली, दि. 24 जून :  उत्तराखंडातील डेहराडून व हरिद्वार येथे जाऊन आपण माहिती घेतली असता मदत व बचाव कार्याला वेग आला असून महाराष्ट्रातील जवळपास 49 अधिकारी ठिकठिकाणी महाराष्ट्रातील भाविकांना योग्य ती मदत करीत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली व भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे योग्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायंकाळी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
          आपण गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सकाळी साडे दहा वाजता विमानाने डेहराडून येथे पोहचलो. त्याठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस, उत्तराखंडचे खासदार सतपाल महाराज, उत्तराखंडचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित होते.  
          महाराष्ट्रातून 2949 भाविक उत्तराखंडला गेले असून त्यातील जवळपास 2200 भाविकांना आपआपल्या गावी परत पाठविण्यात राज्य शासनाच्या यंत्रणेला यश आले आहे.
          बद्रीनाथ येथे देशातील जवळपास 4 हजार भाविक अडकून आहेत. त्यात महाराष्ट्रातील चारशे ते साडे चारशे भाविक आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. त्यांना तेथून बाहेर हलविण्याचे काम जोमात सुरु आहे.  त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे एक हेलीकॉप्टर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करीत आहे.  हवाई दलाचे 14 हेलीकॉप्टर मदतीला आहे. टोकण पध्दतीने व आवश्यकतेनुसार भाविकांना तेथून हलविण्यात येत यावे, अशी सूचना उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना केली असता त्यांनी तातडीने अमंलबजावणी केली.
          उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी  चर्चा केल्यानंतर सध्या मदत व बचाव या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने उत्तराखंड सरकारला 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, त्यातील एक कोटी रुपये देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम लवकरच दिली जाईल. डेहराडून येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भाविकांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. त्यांनतर हरिद्वार येथे हेलीकॉप्टरने जाऊन तेथील मदत कार्याचा आढावा घेतला. तेथील वेगवेगळ्या दोन गटाच्या भाविकांशी रेल्वे स्थानकावर भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या.
          डेहराडून येथे खासदार राजू शेट्टी, चंद्रकांत खैरे, आमदार सुरेश जेथलीया यांची भेट झाली. त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली.
          150 भाविकांशी अजूनही संपर्क झालेला नाही. तथापि जिल्हाधिकारी यांना तालुकास्तरावरुन माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच वस्तुस्थिती कळेल. मुंबई मुख्यालय येथे नियंत्रण कक्ष प्रभावीपणे काम करीत असून डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश, नवी दिल्ली आदी ठिकाणी नियंत्रण कक्ष कार्यरत असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच महाराष्ट्रातील सर्व भाविक सुखरुप पोहचतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
                           महाराष्ट्र सदनातून 487 लोकांना मदत
 महाराष्ट्र सदनात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून 24 जून पर्यंत 487 लोंकाना आवश्यक ती मदत करण्यात आली आहे. 260 लोकांना आतापर्यंत रेल्वेने आपआपल्या गावी पाठविण्यात आले आहे. आणखी शंभर भाविकांची याठिकाणी येण्याची शक्यता असून आज तिसर्‍या दिवशीही याठिकाणी सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला. काल रेल्वे मंत्र्यांची भेट घेल्यामुळे रेल्वे आरक्षणाचा मार्गही सुकर झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
                        .       00000000






२१०० महाराष्ट्रीय पर्यटकांची सुटका;
मुख्यमंत्री डेहराडून, हरिद्वार येथे दाखल
डेहराडून, दिनांक २१ जून :  उत्तराखंड येथील महाप्रलयात अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविक आणि पर्यटकांना सुखरुप परत आणण्याची मोहीम जोरात सुरु असून आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डेहराडूनला भेट देऊन मदत कार्याची प्रत्यक्ष पहाणी केली.  त्याचप्रमाणे उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याशी देखील चर्चा केली.  मुख्यमंत्री हे गेले तीन दिवस नवी दिल्ली येथे उपस्थित असून या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत.  
काल मुख्यमंत्री डेहराडून येथे रवाना झाले होते.  परंतु खराब हवामानामुळे त्यांना विमान उतरविण्याची परवानगी मिळाली नव्हती.  आज सकाळी मुख्यमंत्री डेहराडून येथे पोहचले.  त्यानंतर त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 
आतापर्यंत महाराष्ट्रातील उत्तराखंडमध्ये अडकलेल्या २,९४९ लोकांपैकी २१०० लोकांना सुखरुप काढण्यात यश आले असून महाराष्ट्र सदनाबरोबर डेहराडून, ऋषीकेश आणि हरिद्वार येथील नियंत्रण कक्षातून मदतकार्य जोरात सुरु आहे.  बद्रीनाथ येथे सुमारे ४७५ महाराष्ट्रीय पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे.  सध्या सुरु असलेल्या मदतकार्यामध्ये लोकांचा जीव वाचविण्यावर सर्वोच्च प्राधान्य असून पुढील २ ते ३ दिवसात उर्वरित सर्वांची सुटका होऊ शकेल असे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  महाराष्ट्रातून पुरेशी मदत उत्तराखंड सरकारला झाली आहे असे सांगून ते म्हणाले की, बद्रीनाथकडे जाणारे रस्ते वाहून गेल्याने बचावाचे काम केवळ लष्कराच्या हेलिकॉफ्टर्सद्वारेच  करण्यात येत आहे.  बद्रीनाथची व्हॅली अरुंद असल्याने देखील मदतकार्यास अडथळे येत आहेत.  सुदैवाने हवामान सध्या तरी चांगले असल्याने पर्यटकांना लवकरात लवकर काढता येणे शक्य होईल.

-----०----
दि.बा.पाटील यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी
लढणारा लोकनेता हरपला – मुख्यमंत्री
मुंबई, दिनांक 24 जून :  रायगडचे माजी खासदार त्याचप्रमाणे पनवेल-उरणचे माजी आमदार, शेकापचे ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी आयुष्य झिजविणाऱ्या लोकनेत्याची अखेर झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, दिबांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचले. खासदार आणि आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना त्यांनी रायगड जिल्ह्यातील प्रश्न अतिशय धडाडीने मांडले.  विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांनी आपल्या वक्तृत्वाने विधानसभा गाजविली.  शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर झालेला कुठलाही अन्याय त्यांनी कधीच सहन केला नाही आणि म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून जनतेने गौरविले.  साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगिकार करणाऱ्या या नेत्याने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेल्या लढ्याची निश्चितच नोंद होईल. त्यांच्या निधनाने जनसामान्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.
-----०-----
                     


रविवार, २३ जून, २०१३

उत्तराखंडमधे अडकलेल्या महाराष्ट्रातील
सुमारे दोन हजार भाविकांना सुखरुप परत पाठविले
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
नवी दिल्ली, दि. 23 जून :उत्तराखंडामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार भविकांना सुखरुप गावी परत पाठविले असून भविष्यातही यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश नियंत्रण कक्षाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
       मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांपासून दिल्लीत असून उत्तराखंडातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना ते पुढे म्हणाले, आपण काल आणि आज महाराष्ट्र सदनात वास्तव्यास असलेल्या भाविकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. महाराष्ट्र सदनाबरोबर डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश, येथे ही नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहे. प्रधान सचिव, सचिव यांच्यासह सुमारे तीस अधिकार्‍यांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असून ‍िनवासी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 150 जणांची टिम नवी दिल्ली येथे काम करीत आहे.
          दिल्लीत आल्यानंतर त्यांची राहण्याची, जेवणाची व रेल्वे तिकिट व प्रत्येकाला 2 हजार देऊन त्यांना गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 2 हजार 949 भाविकांपैकी जवळपास 2 हजार भाविक परत गेले आहे. अन्य भाविकांच्या संपर्कात आमचे अधिकारी आहेत असे, त्यांनी यावेळी सांगितले. 
          मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रातून उत्तराखंडमध्ये गेलेल्या प्रत्येक भाविकास सुखरुप पोहचविण्यासाठी  राज्यसरकार कसोसीने प्रयत्न करीत आहे. बचाव कामी कोणत्याही पध्दतीची कमतरता येऊ नये यासाठी आपण या आधीच उत्तराखंड सरकारला 10 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. त्यातील 1 कोटी रुपयांची रोख मदत आज पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आज आपण डेहराडून येथे विमानाने गेलो होतो. पण, हवामान खराब असल्याने विमान उतरविण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे परत यावे लागले. उद्या सकाळी आपण पुन्हा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
        राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस हे स्वत: डेहराडूनलाच मुक्कामी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील भाविकांना सुखरुप स्वगृही पोहचवण्याचे कार्य सुरु आहे. या बचाव कार्यासाठी आतापर्यंत राज्यातील सक्षम अधिकार्‍यांचे पथक उत्तराखंडमधे पाठवले असून ठिकठिकाणी अडकलेल्या मराठी भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे.
            आज सकाळी आपण उत्तराखंडहून परत आलेल्या व महाराष्ट्र सदनातील मदत समन्वय नियंत्रण कक्षात आश्रयास असलेल्या किमान 70 भाविकांशी संवाद साधला.  या भाविकांना स्वगृही पोहचविण्यासाठी येत असलेल्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्री मल्लीकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करुन अधिकचे रेल्वेचे डबे लावण्याबाबत विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले









शुक्रवार, २१ जून, २०१३

उत्तराखंडमध्ये श्री. आर.ए. राजीव व विकास खारगे यांची नियुक्ती
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५० जणांचे पथक रात्रंदिवस
कार्यरत : आतापर्यंत २,१३० प्रवाशांशी संपर्क
          मुंबई, दि. 21 जून: उत्तराखंडमध्ये अस्मानी आपत्तीत अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांची सुटका करुन त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व्यापक उपाययोजना केली आहे. आतापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, महसुल व परिवहन विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स व इतर कर्मचारी असे ५० जण उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी दाखल झाले आहेत.आतापर्यंत २,१३० व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश आले आहे. या कामात समन्वय ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे संचालक विकास खारगे यांची डेहराडुन येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वत: सातत्याने या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहुन आढावा घेत आहेत.
उत्तराखंडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्याची पथके उत्तराखंड आणि नवी दिल्ली येथे पाठविण्यात आली आहेत. या पथकांनी आपली कामे सुरु केली असून, अडचणीतून बाहेर आलेल्या सर्व प्रवाशांना महाराष्ट्रात सुखरुप पाठविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. राज्य शासनाने 24 तास कार्यरत असणाऱ्या 022-22027990 / 22816625 या हेल्पलाईन सुरु केल्या आहेत.
          राज्याच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या प्रत्येक विभागातून पाच कुशल डॉक्टर्सचे पथक, तसेच 1 उपजिल्हाधिकारी, 1 तहसिलदार, 1 नायब तहसिलदार, 2 लिपिक असे पाच व्यक्तींचे पथकही डेहराडून येथे विमानाने खास व्यवस्था करुन पाठविण्यात आले आहे. परिवहन विभागातील तीन अधिकारी नवी दिल्ली येथे थांबुन दिल्लीत पोचलेल्या प्रवाशांना पुढे पाठविण्याची व्यवस्था करणार आहेत, संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे सातत्याने आपल्या जिल्ह्यातील जे नागरिक उत्तराखंड येथे गेले आहेत त्यांचा शोध घेण्याचा व संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
          उत्तराखंड येथे पाठविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नांवे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :-
·        श्री. एम.एस.रामचंद्रानी, सह व्यवस्थापकीय संचालक,  राज्य रस्ते विकास महामंडळ,- 09987114993
·        श्री. मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी, ठाणे – 09920782571
·        श्री. जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी, रायगड – 08975178122
·        श्री. नितीन मुंडेवार, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर – 09423962243
·        श्री. अमित शेडगे, नायब तहसिलदार, रायगड- 09766040931
राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातील तीन अधिकारी नवी दिल्ली येथे नियुक्त करण्यात आले असून प्रवासासंदर्भात सर्वतोपरी मदत करणार आहेत. त्यांची नांवे व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे :-    
१)    श्री. आर. एम. मदने  - 9422088889  
२)    श्री. विजय शलके - 9702378383
३)    श्री. दीपक उगले – 9766677447
उत्तराखंड येथे नियुक्त केलेल्या पाच डॉक्टरांची नांवे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :-
१)    डॉ. निलेश भिलावे –
२)    डॉ. सौरव गांधी  - 09594496971
३)    डॉ. महेंद्र वावेकर – 09890426744
४)    डॉ. विलास घराटे – 09892754896
५)    डॉ. सुरेश निनावे – 09222481551
उत्तराखंड येथे विविध ठिकाणी शिबीर कार्यालय उघडण्यात आली असून तेथे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नांवे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :-
१)    प्रदीप कुमार, अतिरिक्त निवासी आयुक्त – 9868140663/ 8650002066
२)    श्रीमती नंदिनी आवडे, सहाय्यक निवासी आयुक्त (डेहराडून) -9868868286/9999483600
३)    श्री. जगदीश चंद्र (लिपिक-टंकलेखक, डेहराडून) -9818187793.
४)    श्री. प्रेम बलाभ – (वाहन चालक, डेहराडून) -9968096624.
५)    श्री. प्रशांत कापडे (अव्वल कारकून, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय) हरिद्वार- 9892217955.
६)    श्री. विशाल दौंडकर, (नायब तहसिलदार, ठाणे) डेहराडून – 8108134734.
७)    श्री. प्रवीण टाके, (जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली) 9717140495.
डेहराडून सचिवालय, तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाच्या हेलिकॉप्टर लॅण्डींगच्या ठिकाणी ऋषिकेश येथे दुसरे कार्यालय तर हरीद्वार रेल्वे स्टेशन येथे तिसरे आणि नागरी विमान तळ, सहस्त्रधारा येथे चौथे कार्यालय उघडण्यात आले आहे.
Ø राज्यातील प्रवासी विविध ठिकाणी अडकले आहेत त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना कळविले असून, दिल्ली आणि हरीद्वार येथून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये आपदग्रस्त प्रवाशांसाठीच आरक्षित ज्यादा कोचेसची व्यवस्था करण्याबाबत सांगितले आहे.
Ø राज्यातील प्रवाशांच्या सुखरुप परतीसाठी आवश्यक ती  आर्थिक मदत शिबिर कार्यालयामार्फत पुरविण्याबाबत राज्य शासनाने सर्व व्यवस्था केली आहे.
Ø उत्तराखंड शासनास मुख्यमंत्र्यांनी 10 कोटींची मदत  जाहीर केली आहे.
Ø मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 लाख रुपये महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
Ø उत्तराखंड येथील विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडे 15 लाख रुपयांची मदत पाठविण्यात आली आहे.
Ø डेहराडून येथील शिबीर कार्यालयात प्रत्येक व्यक्तीमागे 2 हजार रुपये या प्रमाणे रोख रक्कमेच्या स्वरुपात मदत देण्यात येणार आहे.
Ø प्रवाशांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली असून 200 प्रवाशी यापूर्वीच दाखल झाले आहेत.

                                   ०००००००

गुरुवार, २० जून, २०१३

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रकर्मींना राज्य शासनातर्फे यंदापासून 1 लाखांचे पुरस्कार
मुंबई, दि. 19 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या मराठी चित्रकर्मींना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत दुपटीने वाढ करून यंदापासूनच एक लाख रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.
            सह्याद्री अतिथीगृहामध्ये सांस्कृतिक कार्य विभागातर्फे  60 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त मराठी कलावंतांचा सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे,राज्यमंत्री फौजिया खान, सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे आदींसह चित्रपटसृष्टीतील मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, यावर्षी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाजी मारून संपूर्ण देशात राज्याची मान उंचावली आहे. मराठी चित्रपटसृष्टीने केलेल्या या कामगिरीची दखल घेण्यासाठी राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून हा सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. यावर्षापासून पुरस्काराची रक्कम 51 हजारांवरून एक लाख रूपये एवढी करण्यात येणार असून यंदाच्या पुरस्कारार्थींनाही एक लाख रुपयेच दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कथा, पटकथा, तांत्रिकबाबी या सर्व बाजूंनी मराठी चित्रपटसृष्टी परीपक्व झाली असून मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सक्षम असून ऑस्कर पुरस्कारापासून मराठी चित्रपट आता दूर नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दादासाहेब फळके चित्रनगरीच्या आधुनिकीकरणासाठी त्याचबरोबर कोल्हापूर चित्रनगरीच्या विस्तारासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देवतळे म्हणाले, मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमटल्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरातील संपूर्ण पुरस्काराच्या 25 टक्के पुरस्कार हे यंदा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय स्तराबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भरीव कामगिरी करावी यासाठी राज्य शासनातर्फे विविध प्रोत्साहनपर उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षातही विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले, असे श्री. देवतळे यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटनपाटील-(धग),रत्नाकर मतकरी- (इव्हेस्टमेंट), विक्रांत पवार- (कातळ),गौरी पटवर्धन- (मोदीखानाच्या दोन गोष्टी), ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले- (अनुमती),अभिनेत्री उषा जाधव- (धग), संगीतकार शैलेंद्र बर्वे- (संहिता), बाल कलाकार कु. हंसराज जगताप- (धग), छायाचित्रकार अभिमन्यू डांगे- (कातळ)यांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी रोख 51 हजार रूपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


दरम्यान, या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाशी संबंधीतांचा सत्कारही करण्यात आला. निर्माते विशाल गवारे (धग), श्री. गानू (अनुमती), दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (अनुमती), निर्माते रवी गुप्ता (संहिता), दिग्दर्शक सुमित्रा (संहिता) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेत्री उषा जाधव आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यराज्यमंत्री फौजिया खान यांनी आभार मानले. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
0 0 0 0 0

बुधवार, १९ जून, २०१३

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या यात्रेकरुंसाठी
महाराष्ट्र शासनातर्फे 10 कोटी रुपयांची मदत
मुंबई, दि. 19 : उत्तराखंडमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंना सुखरुप सुरक्षितस्थळी आणणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून यासाठी सर्व ते उपाय योजण्यात येत आहेत. या मदतकार्यासाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. डेहराडुनप्रमाणेच हरिद्वार येथेही राज्य सरकारतर्फे आणखी एक शिबिर कार्यालयही आज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, या घटनेची माहिती कळताच तात्काळ नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या अधिपत्याखाली चार अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविण्यात आले असून हे पथक डेहराडून येथे उत्तराखंडामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी संपर्क साधून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सुखरूप आणण्याकरिता प्रयत्न करीत आहे. या करीता ठाणे व रायगड मधील उपजिल्हाधिकाऱ्यांचे एक पथक तेथे रवाना झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार राज्यातील 1353 भाविक पर्यटक त्या भागात अडकले असून त्यापैकी 1019 जणांशी संपर्क झालेला आहे. रस्ते वाहुन गेल्याने, दूरध्वनी यंत्रणा बंद पडल्याने, मोबाईलच्या बॅटरी संपल्याने इतर यात्रेकरुंशी संपर्क होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संरक्षण विभाग, एनआरडीएफचे वरिष्ठ अधिकारी तसेच      उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा व मुख्य सचिव यांच्याशी संपर्कात आहेत.
 अडकून पडलेल्यांची सुटका करुन त्यांना सुरक्षित स्थळी आणणे व त्यांना हेलिकॉप्टरद्वारे अन्न-पाण्याचा पुरवठा करणे, ही सद्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असून लष्कराने संपूर्ण मदत कार्याला सुरुवात केली आहे. चार हेलिपॅड बनविण्यात आली असून 17 हेलिकॉप्टरद्वारे यात्रेकरुंना सुखरुपस्थळी आणण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बाबतीत लष्कराशीही संपर्क साधण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रस्ते वाहुन गेल्याने या यात्रेकरुंना हेलिकॉप्टरद्वारेच अन्नाचा पुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांना सुक्या अन्नाची पॅकेटस, सुकामेवा, पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आदी सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे. प्रवासी यात्रा कंपन्यांकडून अडकलेल्या यात्रेकरुंची माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. अनेक व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यांना धीर देण्यात येत आहे. या यात्रेकरुना सुखरुप परत आणण्यात राज्य सरकार कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
प्रवाशांनी मदत व माहितीसाठी श्री. प्रदीप कुमार, अतिरिक्त निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन : 09868140663, जगदीश चंद्र उपाध्याय 09818187793 यांच्याशी संपर्क साधावा.  मंत्रालयात राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र, मुंबई 02222027990, 22816625, 22854168 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
000000000
अल्पसंख्याक उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षांकरिता प्रशिक्षण योजना
निर्णय : केंद्र व राज्य शासनाच्या नागरी सेवा त्याचप्रमाणे निमशासकीय सेवेत अल्पसंख्याक उमेदवारांचे प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी   मौलाना आझाद मोफत शिकवणी व  संलग्न योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.  या अंतर्गत राज्यात 7 ठिकाणी प्रशिक्षणाची सोय करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हे प्रशिक्षण मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक या ठिकाणी राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांच्या केंद्रांमधून देण्यात येईल. ही योजना राबविण्यासाठी 5 कोटी 49 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 
योजनेची व्याप्ती : या योजनेत केंद्रीय नागरी सेवा, राज्य नागरी सेवा अधिकारी संवर्ग, राज्य नागरी सेवा वर्ग-3 सेवा, बँकींग सेवा, अभियांत्रिकी, वैद्यकीय या परीक्षांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायीक प्रवेश परीक्षा तसेच 10 व 12 वी मधील अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी विशेष वर्ग सुरु करण्यात येतील.
            या योजनेचा लाभ अल्पसंख्याक असलेल्या राज्याच्या अधिवासी उमेदवारास होईल.  30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
 प्रशिक्षणाचा लाभ : या योजनेचा दरवर्षी 4 हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यासाठी प्रवर्गनिहाय जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
यूपीएससी- एकूण 250, एमपीएससी - 250, एमपीएससी वर्ग 3 – 500,
बँकींग- 400, सामायीक प्रवेश परीक्षा – 600, विशेष वर्ग – 2000.
या प्रशिक्षणाचा कालावधी खालील प्रमाणे राहील.
केंद्रीय नागरी सेवा – 10 महिने, राज्य नागरी सेवा-10 महिने,
राज्य नागरी सेवा (वर्ग3) – 10 महिने, बँकींग सेवा – 6 महिने,
सामायीक प्रवेश परीक्षा – 1 किंवा 2 वर्षे,
अनुत्तीर्ण 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग- 10 महिने किंवा शासन निर्धारीत करेल इतका कालावधी.

प्रशिक्षणासाठी रक्कम : या प्रशिक्षणासाठी खालील प्रमाणे संस्थांना रक्कम देण्यात येईल.
यूपीएससी- 25 हजार रुपये प्रती उमेदवार किंवा संस्थेमार्फत आकारण्यात येणारी फी यापैकी जे कमी असेल ती रक्कम.
एमपीएससी - 20 हजार रुपये प्रती उमेदवार किंवा संस्थेमार्फत आकारण्यात येणारी फी यापैकी जे कमी असेल ती रक्कम.
एमपीएससी वर्ग 3 - 15 हजार रुपये प्रती उमेदवार किंवा संस्थेमार्फत आकारण्यात येणारी फी यापैकी जे कमी असेल ती रक्कम.
बँकींग - 8 हजार रुपये प्रती उमेदवार किंवा संस्थेमार्फत आकारण्यात येणारी फी यापैकी जे कमी असेल ती रक्कम.
सामायीक परीक्षा - 20 हजार रुपये प्रती उमेदवार किंवा संस्थेमार्फत आकारण्यात येणारी फी यापैकी जे कमी असेल ती रक्कम.
विशेष वर्ग – 10 वी साठी प्रती उमुदवार 4 हजार  व 12 साठी प्रती उमेदवार 5 हजार किंवा संस्थेमार्फत आकारण्यात येणारी फी यापैकी जे कमी असेल ती रक्कम.
-----0-----
राज्यातील 50 गुणवत्ताधारक मुलींना
आयआयटी-जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
निर्णय : राज्यातील मुलींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा होण्यासाठी इयत्ता 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या 50 गुणवत्ताधारक मुलींना आयआयटी, जेईई, एआयईईई आणि इंटरनॅशनल ऑलम्पियाड अशा स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन देणाऱ्या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली.  यासाठी एकूण 47 लाख 50 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मुलींची निवड IITin’s PACE या संस्थेमार्फत करण्यात येईल. 
पार्श्वभूमी : राज्यातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना दर्जात्मक उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.
योजनेचे स्वरुप व व्याप्ती : 10 वी उत्तीर्ण झालेल्या किंवा 10 वी परीक्षेस बसलेल्या 50 मुलींना मार्गदर्शन 2 वर्षात देण्यात येईल.  राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या PACE या संस्थेच्या अंधेरी येथील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात या विद्यार्थींनींना 11 वी विज्ञान शाखेत चालू शैक्षणिक वर्षात विनामुल्य प्रवेश देण्यात येईल.
            प्रवेश परीक्षेचा खर्च तसेच निवडीनंतरच्या महाविद्यालय परिसरात राहण्यासाठी वसतीगृह, जेवणाचा खर्च प्रति विद्यार्थी, प्रति महिना 7 हजार 500 रुपये इतका येईल आणि तो शासनामार्फत भागविला जाईल.
            50 मुली निवडण्याकरिता घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेकरिता अभ्यासक्रमात इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वीचे गणित व विज्ञान हे विषय असतील.  या मुलींची निवड करतांना राज्य शासनाचे आरक्षणासंबंधीचे धोरण लागू असणार आहे.                         
----0----
मराठवाडा कृषी विद्यापीठाला
वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा निर्णय
निर्णय : परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी असे करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  याला अनुसरुन मराठवाडा कृषी अधिनियमात अध्यादेशाद्वारे दुरुस्ती करण्यात येईल.
पार्श्वभूमी : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे हरीत क्रांती व कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांचा या जन्मशताब्दी वर्षातच उचित सन्मान करण्याचे शासनाने ठरविले आहे.  त्याचाच एक भाग म्हणून परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
            मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना 18 मे 1972 रोजी करण्यात आली असून याच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील जिल्हे येतात.  या ठिकाणी कृषी व संलग्न विषयातील शिक्षण, विस्तार शिक्षण व बिजोत्पादन ही कार्ये केली जातात.
-----0-----