उत्तराखंडातील भाविक सुखरुप मदत व बचाव कार्याला वेग
- मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री
नवी
दिल्ली, दि. 24 जून : उत्तराखंडातील डेहराडून व हरिद्वार येथे जाऊन आपण
माहिती घेतली असता मदत व बचाव कार्याला वेग आला असून महाराष्ट्रातील जवळपास 49 अधिकारी
ठिकठिकाणी महाराष्ट्रातील भाविकांना योग्य ती मदत करीत आहेत. उत्तराखंडचे
मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली व
भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे योग्य ती मदत केली
जाईल, अशी ग्वाही दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
सायंकाळी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आपण गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत असून संपूर्ण परिस्थितीवर
लक्ष ठेवून असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सकाळी साडे दहा
वाजता विमानाने डेहराडून येथे पोहचलो. त्याठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे सुरु
असलेल्या मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री विजय बहुगुणा
यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश
धस, उत्तराखंडचे खासदार सतपाल महाराज, उत्तराखंडचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी
उपस्थित होते.
महाराष्ट्रातून 2949 भाविक उत्तराखंडला गेले असून त्यातील
जवळपास 2200 भाविकांना आपआपल्या गावी परत पाठविण्यात राज्य शासनाच्या यंत्रणेला यश
आले आहे.
बद्रीनाथ येथे देशातील जवळपास 4 हजार भाविक अडकून आहेत. त्यात
महाराष्ट्रातील चारशे ते साडे चारशे भाविक आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला आहे.
त्यांना तेथून बाहेर हलविण्याचे काम जोमात सुरु आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे एक हेलीकॉप्टर
त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करीत आहे. हवाई दलाचे 14 हेलीकॉप्टर मदतीला आहे. टोकण
पध्दतीने व आवश्यकतेनुसार भाविकांना तेथून हलविण्यात येत यावे, अशी सूचना
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना केली असता त्यांनी तातडीने अमंलबजावणी केली.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सध्या मदत व बचाव या कामाला
प्राधान्य देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने उत्तराखंड सरकारला
10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, त्यातील एक कोटी रुपये देण्यात आले आहे.
उर्वरित रक्कम लवकरच दिली जाईल. डेहराडून येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या
भाविकांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. त्यांनतर हरिद्वार येथे हेलीकॉप्टरने
जाऊन तेथील मदत कार्याचा आढावा घेतला. तेथील वेगवेगळ्या दोन गटाच्या भाविकांशी
रेल्वे स्थानकावर भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या.
डेहराडून येथे खासदार राजू शेट्टी, चंद्रकांत खैरे, आमदार
सुरेश जेथलीया यांची भेट झाली. त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली.
150 भाविकांशी अजूनही संपर्क झालेला नाही. तथापि जिल्हाधिकारी
यांना तालुकास्तरावरुन माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच
वस्तुस्थिती कळेल. मुंबई मुख्यालय येथे नियंत्रण कक्ष प्रभावीपणे काम करीत असून डेहराडून,
हरिद्वार, ऋषिकेश, नवी दिल्ली आदी ठिकाणी नियंत्रण कक्ष कार्यरत असून संपूर्ण
परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच महाराष्ट्रातील सर्व भाविक सुखरुप पोहचतील,
असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र सदनातून 487 लोकांना मदत
महाराष्ट्र सदनात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून
24 जून पर्यंत 487 लोंकाना आवश्यक ती मदत करण्यात आली आहे. 260 लोकांना आतापर्यंत
रेल्वेने आपआपल्या गावी पाठविण्यात आले आहे. आणखी शंभर भाविकांची याठिकाणी
येण्याची शक्यता असून आज तिसर्या दिवशीही याठिकाणी सुरु असलेल्या मदत कार्याचा
आढावा घेतला. काल रेल्वे मंत्र्यांची भेट घेल्यामुळे रेल्वे आरक्षणाचा मार्गही
सुकर झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
. 00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा