२१०० महाराष्ट्रीय पर्यटकांची सुटका;
मुख्यमंत्री डेहराडून, हरिद्वार येथे दाखल
डेहराडून, दिनांक २१ जून : उत्तराखंड येथील महाप्रलयात अडकलेल्या
महाराष्ट्रातील भाविक आणि पर्यटकांना सुखरुप परत आणण्याची मोहीम जोरात सुरु असून आज
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डेहराडूनला भेट देऊन मदत कार्याची प्रत्यक्ष
पहाणी केली. त्याचप्रमाणे उत्तराखंडचे
मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याशी देखील चर्चा केली. मुख्यमंत्री हे गेले तीन दिवस नवी दिल्ली येथे
उपस्थित असून या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत.
काल मुख्यमंत्री डेहराडून येथे रवाना झाले होते. परंतु खराब हवामानामुळे त्यांना विमान
उतरविण्याची परवानगी मिळाली नव्हती. आज
सकाळी मुख्यमंत्री डेहराडून येथे पोहचले.
त्यानंतर त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांची भेट घेऊन
त्यांच्याशी चर्चा केली.
आतापर्यंत महाराष्ट्रातील उत्तराखंडमध्ये अडकलेल्या
२,९४९ लोकांपैकी २१०० लोकांना सुखरुप काढण्यात यश आले असून महाराष्ट्र सदनाबरोबर
डेहराडून, ऋषीकेश आणि हरिद्वार येथील नियंत्रण कक्षातून मदतकार्य जोरात सुरु
आहे. बद्रीनाथ येथे सुमारे ४७५ महाराष्ट्रीय
पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. सध्या सुरु
असलेल्या मदतकार्यामध्ये लोकांचा जीव वाचविण्यावर सर्वोच्च प्राधान्य असून पुढील २
ते ३ दिवसात उर्वरित सर्वांची सुटका होऊ शकेल असे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितले. महाराष्ट्रातून पुरेशी
मदत उत्तराखंड सरकारला झाली आहे असे सांगून ते म्हणाले की, बद्रीनाथकडे जाणारे
रस्ते वाहून गेल्याने बचावाचे काम केवळ लष्कराच्या हेलिकॉफ्टर्सद्वारेच करण्यात येत आहे. बद्रीनाथची व्हॅली अरुंद असल्याने देखील
मदतकार्यास अडथळे येत आहेत. सुदैवाने
हवामान सध्या तरी चांगले असल्याने पर्यटकांना लवकरात लवकर काढता येणे शक्य होईल.
-----०----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा