इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया
विनाव्यत्यय, तातडीने पूर्ण करु-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री
के. एस. राव
मुंबई,
दि. २५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी येथील इंदू मिलच्या जमिनीच्या प्रत्यक्ष
हस्तांतरणाची प्रक्रिया विनाव्यत्यय आणि तातडीने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही
नवनियुक्त केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री के. एस. राव यांनी दिली.
श्री.
राव यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधानभवनातील त्यांच्या दालनात
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार
बॉंठीया, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव जोहरा चटर्जी, संयुक्त सचिव सुनैना तोमर,
मुंबई महापालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव
अजितकुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव
मनोज सौनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री
श्री. चव्हाण यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील नागरीकांचे
प्रेरणास्थान आहे. मुंबईत इंदू मिलच्या जागी त्यांचे भव्य स्मारक उभारणे नियोजित
आहे. एनटीसीकडून राज्य शासनाकडे जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन
स्मारक उभारणीच्या कामाला गती दिली जाईल, असे ते म्हणाले.
वस्त्रोद्योगासमोरील अडचणी दूर करु – राव
महाराष्ट्रात
कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाला
पोषक असे वातावरण आहे. राज्यातील वस्त्रोद्योगासमोरील सर्व अडचणी दूर केल्या
जातील, अशी ग्वाही श्री. राव यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाच्या
हिताच्या दृष्टीने केद्र शासनाच्या टफ योजनेतही अनुकुल सुधारणा केल्या जातील, असे
ते म्हणाले. महाराष्ट्राचे नवीन वस्त्रोद्योग धोरण अत्यंत आदर्श असून त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात
गुंतवणूक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री
श्री. चव्हाण म्हणाले की, राज्याच्या काही ठराविक भागातच एकत्रित झालेल्या
उद्योगांना विदर्भ, मराठवाडा अशा अविकसीत भागात आकर्षित करण्याच्या दृष्टीने
राज्याने अत्यंत महत्वाकांक्षी असे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. विकासाचा
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी या धोरणाचा उपयोग होऊ शकेल. कापूस उत्पादीत
होणाऱ्या विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाला या धोरणामुळे चालना मिळेल, असेही ते
म्हणाले.
०००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा