रविवार, २३ जून, २०१३

उत्तराखंडमधे अडकलेल्या महाराष्ट्रातील
सुमारे दोन हजार भाविकांना सुखरुप परत पाठविले
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
नवी दिल्ली, दि. 23 जून :उत्तराखंडामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार भविकांना सुखरुप गावी परत पाठविले असून भविष्यातही यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश नियंत्रण कक्षाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
       मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांपासून दिल्लीत असून उत्तराखंडातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना ते पुढे म्हणाले, आपण काल आणि आज महाराष्ट्र सदनात वास्तव्यास असलेल्या भाविकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. महाराष्ट्र सदनाबरोबर डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश, येथे ही नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहे. प्रधान सचिव, सचिव यांच्यासह सुमारे तीस अधिकार्‍यांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असून ‍िनवासी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 150 जणांची टिम नवी दिल्ली येथे काम करीत आहे.
          दिल्लीत आल्यानंतर त्यांची राहण्याची, जेवणाची व रेल्वे तिकिट व प्रत्येकाला 2 हजार देऊन त्यांना गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 2 हजार 949 भाविकांपैकी जवळपास 2 हजार भाविक परत गेले आहे. अन्य भाविकांच्या संपर्कात आमचे अधिकारी आहेत असे, त्यांनी यावेळी सांगितले. 
          मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रातून उत्तराखंडमध्ये गेलेल्या प्रत्येक भाविकास सुखरुप पोहचविण्यासाठी  राज्यसरकार कसोसीने प्रयत्न करीत आहे. बचाव कामी कोणत्याही पध्दतीची कमतरता येऊ नये यासाठी आपण या आधीच उत्तराखंड सरकारला 10 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. त्यातील 1 कोटी रुपयांची रोख मदत आज पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आज आपण डेहराडून येथे विमानाने गेलो होतो. पण, हवामान खराब असल्याने विमान उतरविण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे परत यावे लागले. उद्या सकाळी आपण पुन्हा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
        राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस हे स्वत: डेहराडूनलाच मुक्कामी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील भाविकांना सुखरुप स्वगृही पोहचवण्याचे कार्य सुरु आहे. या बचाव कार्यासाठी आतापर्यंत राज्यातील सक्षम अधिकार्‍यांचे पथक उत्तराखंडमधे पाठवले असून ठिकठिकाणी अडकलेल्या मराठी भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे.
            आज सकाळी आपण उत्तराखंडहून परत आलेल्या व महाराष्ट्र सदनातील मदत समन्वय नियंत्रण कक्षात आश्रयास असलेल्या किमान 70 भाविकांशी संवाद साधला.  या भाविकांना स्वगृही पोहचविण्यासाठी येत असलेल्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्री मल्लीकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करुन अधिकचे रेल्वेचे डबे लावण्याबाबत विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा