गुरुवार, २० जून, २०१३

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रकर्मींना राज्य शासनातर्फे यंदापासून 1 लाखांचे पुरस्कार
मुंबई, दि. 19 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या मराठी चित्रकर्मींना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत दुपटीने वाढ करून यंदापासूनच एक लाख रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.
            सह्याद्री अतिथीगृहामध्ये सांस्कृतिक कार्य विभागातर्फे  60 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त मराठी कलावंतांचा सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे,राज्यमंत्री फौजिया खान, सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे आदींसह चित्रपटसृष्टीतील मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, यावर्षी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाजी मारून संपूर्ण देशात राज्याची मान उंचावली आहे. मराठी चित्रपटसृष्टीने केलेल्या या कामगिरीची दखल घेण्यासाठी राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून हा सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. यावर्षापासून पुरस्काराची रक्कम 51 हजारांवरून एक लाख रूपये एवढी करण्यात येणार असून यंदाच्या पुरस्कारार्थींनाही एक लाख रुपयेच दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कथा, पटकथा, तांत्रिकबाबी या सर्व बाजूंनी मराठी चित्रपटसृष्टी परीपक्व झाली असून मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सक्षम असून ऑस्कर पुरस्कारापासून मराठी चित्रपट आता दूर नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दादासाहेब फळके चित्रनगरीच्या आधुनिकीकरणासाठी त्याचबरोबर कोल्हापूर चित्रनगरीच्या विस्तारासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देवतळे म्हणाले, मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमटल्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरातील संपूर्ण पुरस्काराच्या 25 टक्के पुरस्कार हे यंदा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय स्तराबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भरीव कामगिरी करावी यासाठी राज्य शासनातर्फे विविध प्रोत्साहनपर उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षातही विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले, असे श्री. देवतळे यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटनपाटील-(धग),रत्नाकर मतकरी- (इव्हेस्टमेंट), विक्रांत पवार- (कातळ),गौरी पटवर्धन- (मोदीखानाच्या दोन गोष्टी), ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले- (अनुमती),अभिनेत्री उषा जाधव- (धग), संगीतकार शैलेंद्र बर्वे- (संहिता), बाल कलाकार कु. हंसराज जगताप- (धग), छायाचित्रकार अभिमन्यू डांगे- (कातळ)यांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी रोख 51 हजार रूपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


दरम्यान, या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाशी संबंधीतांचा सत्कारही करण्यात आला. निर्माते विशाल गवारे (धग), श्री. गानू (अनुमती), दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (अनुमती), निर्माते रवी गुप्ता (संहिता), दिग्दर्शक सुमित्रा (संहिता) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेत्री उषा जाधव आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यराज्यमंत्री फौजिया खान यांनी आभार मानले. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा