प्रशासकीय
यंत्रणा अधिक गतीमान होणे आवश्यक - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 28 : राज्याच्या विकासात प्रशासनाचे महत्वाचे स्थान आहे.
राज्याचा विकास दर वाढावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक गतीमान करण्यासाठी सर्व
प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा सन 2011 व 12 या
वर्षाचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंत्रालयातील
परिषद सभागृहात करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या समारंभास
उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री
जयंत पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, आमदार
श्रीमती ॲनी शेखर, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासकीय कामकाजात गतिमानता
आणण्यासाठी प्रशासनातील रिक्त असलेली सर्व पदे भरण्यात येतील. राज्य
सेवेतील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण देणे
आवश्यक असून त्यांना किमान एक वर्षाचे प्रशिक्षण दिले
पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करावे. आज राज्यात नागरीकरण मोठ्या
प्रमाणात होत असून जवळपास 50 टक्के लोक शहरात रहात आहेत. पुढे हे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लोकांना
चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी नागरी प्रशासन बळकट असणे गरजेचे आहे. प्रशासकीय सेवेत चांगले काम व्हावे यासाठी स्पर्धा होणे आवश्यक आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यात 1 ते 7 मे या कालावधीत नागरी सेवा
सप्ताह साजरा करुन गौरव करावा. राज्याचा मानवी विकास अहवाल नियमित प्रकाशित करावा,
असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ई-ऑफिस प्रणालीमुळे
प्रशासनात पारदर्शकता येते. तसेच महसुलातही वाढ होते यासाठी ई-ऑफिसचा जास्तीत
जास्त वापर व्हायला पाहिजे. प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत काम करताना लोकांचे हित
कसे होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी
संगणकीकरणाचा घेतलेला निर्णय दूरदृष्टी आणि प्रशासनात पारदर्शकता आणणारा होता. जिल्हाधिकाऱ्यांना
नवीन कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 4.5 टक्के निधी देण्यात येणार आहे.
शासनाच्या चांगल्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी केल्याशिवाय त्याचा चांगला परिणाम
दिसत नाही म्हणून प्रशासनाने निर्णयाची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही श्री.
पवार यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले की, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे
कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राज्यातील ग्राम पातळीवर
बायोमॅट्रिक पध्दत सुरु केल्यामुळे भविष्यात चांगला परिणाम दिसून येईल. प्रशासन
गतीमान होण्यासाठी आवश्यक तेथे प्रशासनातील एखादा टप्पा कमी करण्यात यावा. सामान्य
प्रशासन विभागात ई-गव्हर्नन्स करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक
विभागाने आपल्या विभागाच्या कार्य पध्दती नव्याने विकसित करायला हव्यात, यासाठी आवश्यक तेथे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या की, सध्याचे जग गतिमान आहे.
गती हा विकासाचा मंत्र आहे. गतिमान प्रशासन कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे आवश्यक
आहे. गाव पातळीवर सुध्दा अनेक चांगले उपक्रम होत असतात. त्याची नोंद होणे आवश्यक
आहे. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण कामाची माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहोचली पाहिजे.
यासाठी प्रयत्न करावे.
सन 2011 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान
स्पर्धा प्रथम पारितोषिक विभागून तत्कालिन विक्रीकर आयुक्त संजय भाटिया व तुळजाभवानी संस्था तुळजापूरचे अध्यक्ष तथा उस्मानाबाद
जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांना देण्यात आले. दुसरे पारितोषिक व्ही.के. गाडेकर, प्राचार्य, मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शी रोड, लातूर तर तृत्तीय
पारितोषिक अनिल वळीव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
यांना देण्यात आले.
सन 2012 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान
स्पर्धा प्रथम पारितोषिक विकास खारगे, आयुक्त कुटुंब कल्याण व संचालक राष्ट्रीय
ग्रामीण अभियान द्वितीय पारितोषिक विरेंद्र सिंह, सिंधुदुर्ग
जिल्हाधिकारी तर तृत्तीय पारितोषिक शीलानाथ जाधव, संचालक
लेखा व कोषागरे, मुंबई यांना देण्यात आले. याबरोबरच संबंधीत कार्यालयाच्या
प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला.
प्रथम पुरस्कार 10 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 6 लाख रुपये व
तृत्तीय पुरस्कार 4 लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे
स्वरुप आहे.
याप्रसंगी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी.एस. मीना
यांनी केले. तर वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी
उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त
कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000