मंगळवार, २६ मार्च, २०१३


राज्यातील जल,  अपारंपरिक ऊर्जा व कृषी क्षेत्रामध्ये
संशोधनास सर्वतोपरी सहाय्य : मा. मुख्यमंत्री
मुंबई, दि. 25 : मॅसेच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि टाटा कंपनीमधील करारानुसार जल, अपारंपरिक ऊर्जा व कृषी या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांनी आज दिले.
केंब्रिज येथील मॅसेच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष एल. राफेल रेफ आणि उद्योगपती श्री. रतन टाटा यांनी मा. मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अविकसित देश वगळता जल, अपारंपरिक ऊर्जा व कृषी या क्षेत्रांमध्ये फार मोठया समस्या नाहीत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या तीनही क्षेत्रांच्या विकासामध्ये काही समस्या भेडसावत असून त्यावर मात करणे आवश्यक असल्याबाबत चर्चेमध्ये एकमत झाले.  या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यास मोठा वाव आहे. अशा संशोधनातून या तीनही क्षेत्रांचा विकास आणि प्रगती होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात टाटा कंपनी आणि मॅसेच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये यापूर्वीच करार झाला आहे. या करारातंर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानद्वारे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा स्थापन करुन या क्षेत्रांमध्ये संशोधन केले जाणार आहे. 
सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या चर्चेअंती, परस्पर सहकार्याने कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये पायाभूत सोयीसुविधा निर्माण होण्यास मोठे योगदान मिळेल अशी अपेक्षा श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली व त्यातून राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा