अमेरिकेतील मेरीलॅण्ड राज्याच्या गर्व्हनरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
उभयपक्षी व्यापार, उद्योग, शिक्षण क्षेत्राबरोबरच
सांस्कृतिक, क्रीडाक्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय
मुंबई, दि. 30 : आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योग, उच्च शिक्षण याबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये उभयपक्षी सहकार्य करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अमेरिकेतील मेरीलॅण्ड प्रांताचे गर्व्हनर मार्टिन ओमॅली यांनी आज घेतला. मेरीलॅण्डच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने श्री. चव्हाण यांची आज भेट घेतली, त्यावेळी उभयपक्षी विविध क्षेत्रात सहकार्य करावयाच्या मसुद्यावर श्री. चव्हाण आणि श्री. ओमॅली यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज या शिष्टमंडळाने श्री. चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष कुमार सिंह, उप मुख्य राजशिष्टाचार अधिकारी शैलेश बिजुर उपस्थित होते. मेरीलॅण्डच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे कौन्सुल जनरल पीटर हास, विशेष प्रतिनिधी रिटा जो लेविस, सक्रेटरी ऑफ स्टेट जॉन मॅकडोना, डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट राजन नटराजन, सेक्रेटरी ऑफ बिझिनेस ऍ़ण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ख्रिश्चन जोहान्सो, मेरीलॅण्ड प्रतिनिधीगृहातील सभागृहनेते कुमार बर्वे, श्रीमती अरुणा मिलर, सॅम अरोरा, मॉण्टगोमेरी काऊंटीचे अधिकारी इसिया लेगिट, प्रिन्स जॉर्ज काऊंटीचे अधिकारी रुशर्न बेकर, गव्हर्नर ऑफिसचे संचालक सॅम क्लार्क आदींचा समावेश होता.
प्रारंभी श्री. चव्हाण यांनी श्री. ओमॅली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर सुमारे पाऊण तास विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री. ओमॅली यांनी महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबत सविस्तर मााहिती घेतली. मेरीलॅण्ड प्रांतामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. आपल्या शिष्टमंडळातही भारतीय वंशाच्या प्रतिनिधींचा मोठा समावेश आहे, उभयपक्षी सहकार्याची ही परंपरा आपल्याला मोठ्या प्रमाणात पुढे न्यायची आहे, असे श्री. ओमॅली यांनी सांगितले. मुंबईचे वैशिष्ट्यपुर्ण बॉलिवुड, क्रिकेटप्रेम याविषयीही त्यांनी औत्सुक्याने माहिती जाणुन घेतली.
श्री. चव्हाण यंानी शिष्टमंडळाला महाराष्ट्राच्या प्रगतीची सविस्तर माहिती दिली. मेरीलॅण्ड राज्याने पुढे केलेला सहकार्याचा हात आम्ही आनंदाने स्वीकारु आणि ज्या ज्या क्षेत्रात सहकार्य करणे शक्य आहे, त्याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. श्री. ओमॅली यांनी मुख्यमंत्र्यांना मेरीलॅण्ड भेटीचे आग्रहपुर्वक निमंत्रण दिले.
0000000000