पोलीस दलाला आवश्यक ते सहकार्य करण्यास शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११
मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि १३ जुलैच्या बॉम्बस्फोटानंतर पोलीस दलाला विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पोलीस दलाला सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात 'दहशतवादाविरुद्धचा लढा' (काऊंटर टेररिझम) या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास गृहमंत्री आर.आर.पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पंजाबचे माजी पोलीस महासंचालक के.पी.एस. गिल, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक राजन मेढेकर, पोलीस महासंचालक के. सुब्रमण्यम्, पोलीस संशोधन आणि विकास विभागाचे अतिरिक्त महासंचालक कुलदीप शर्मा आदी उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणाले की, नक्षलवाद आणि दहशतवाद हे सुरक्षेच्या दृष्टीने देशासमोरचे मोठे आव्हान असून या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या चर्चासत्राच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना शिकायला मिळतील. तसेच विकास आणि प्रगतीसाठी सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पंजाब, मणिपूर, आसाम, काश्मीर येथे काम करताना आलेल्या विविध अनुभवांचे कथन केल्यावर श्री. के.पी. एस. गिल म्हणाले, कोणतीही समस्या ही फक्त पोलीस बळावर मिटविता येत नाही तर त्यासाठी राजकीय प्रतिसादाचीही आवश्यकता असते. केवळ पोलीस दल प्रशिक्षित करुन चालणार नाही तर ते अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असले पाहिजे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. सुब्रमण्यम यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात श्री. शर्मा, निवृत्त पोलीस अधिकारी व्ही. बालचंद्रन्, एनएसजीचे महासंचालक श्री. मेढेकर आदींनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास देशभरातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा